पाचल : आधीच नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कोरोनाच्या काळातही अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच राज्य शासनाने वेळोवेळी जाहीर केलेली आर्थिक मदत ही शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही. पीकविम्याचा लाभही शेतकऱ्यांना झालेला नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांसाठी शासनाने आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहनराव केळुसकर यांनी केली आहे.
कोरोनाच्या काळातही शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेले आठ दिवस सतत विजांच्या कडकडाटासह वळीवाचा पाऊस पडत आहे. या सतत पडणाऱ्या पावसामुळे आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी-वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे तयार झालेला आंबा गळून पडला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या शिवाय खरीप हंगामाची कामेही खोळंबली आहेत. तसेच शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचेही भिजत घोंगडे आहे. नियमित कर्जफेड करणारे शेतकरी अजूनही शासन मदतीची वाट पाहत आहेत. परंतु शासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकरी वाऱ्यावर पडला आहे. कोरोनाच्या नावाखाली कोणीही पुढाकार घेऊन काम करताना दिसत नाही. शासनाने शेतकऱ्यांची असलेली थकबाकी तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. तसेच कोरोनामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहनराव केळुसकर यांनी केली आहे.