राजापूर : तालुक्यातील सौंदळ हॉल्ट स्थानकाला कायमस्वरुपी स्थानकाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी युवा महाराष्ट्र सामाजिक मंचचे प्रमोद तरळ यांनी केली हाेती. या मागणीला उत्तर देताना सद्यस्थितीत सौंदळ रेल्वे स्थानकाचे क्राॅसिंग स्थानकामध्ये रूपांतर करण्याचे आश्वासन कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
राजापूर तालुक्यासह लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भाग व तालुक्याच्या पूर्व परिसराला लागून असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील अणुस्कुरासहित त्यालगतच्या भागांना सौंदळ स्थानकाचा फायदा होत आहे. या हाॅल्ट स्थानकात केवळ दोनच पॅसेंजर गाड्या थांबत असून, याठिकाणी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे याठिकाणी प्रवाशांना आवश्यक त्या सोयीसुविधा मिळणे गरजेचे बनले आहे. याकरिता सौंदळ हाॅल्ट स्थानकाचे लवकरात लवकर कायमस्वरूपी स्थानकात रूपांतर व्हावे तसेच सायंकाळी व रात्रीच्या काही गाड्यांनाही याठिकाणी थांबे मिळावेत, अशी मागणी करण्यात आली हाेती.
युवा महाराष्ट्र सामाजिक मंचचे प्रमोद तरळ यांनी सौंदळ स्थानकाचे पूर्ण स्थानकात रूपांतरण व्हावे, अशा मागणीचे पत्र कोकण रेल्वे प्रशासनाला दिले होते. या पत्राला कोकण रेल्वे प्रशासनाने उत्तर देताना साैंदळ स्थानक हे हाॅल्ट स्थानक असून, हाॅल्ट स्थानकाच्या मापदंडानुसार या स्थानकावर प्रवासी सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. तसेच सध्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता, गाड्यांना दिलेले थांबे पुरेसे आहेत. निरनिराळ्या सेवा-सुविधांमध्ये वाढ करणे ही एक नियमित प्रकिया आहे. गरजा तसेच स्टेशन प्राधान्य यानुसार टप्प्याटप्प्याने त्यात वाढ केली जाते. त्यामुळे निधी उपलब्धतेनुसार क्राॅसिंग स्थानकासाठीच्या आवश्यक गोष्टींची पूर्तता करून सौंदळ स्थानकाचे हाॅल्ट स्थानकातून क्राॅसिंग स्थानकामध्ये रूपांतरण करण्यात येईल, असे म्हटले आहे.