राजापूर : ‘सरकार दाद तुम्ही घ्या ना, रिफायनरी राजापूरला द्या ना’, असा एल्गार रविवारी राजापुरात रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ आयाेजित मेळाव्यात करण्यात आला. राजापूर शहरानजीकच्या धोपेश्वर येथील पाटीलमळा यशोदिनसृष्टी येथे आयाेजित केलेल्या या मेळाव्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय हाेती.
रिफायनरी प्रकल्पाची मुहूर्तमेढ राजापुरातच व्हावी यासाठी राजापूरवासीयांनी कंबर कसली आहे. तालुक्यातील विविध ५७ सामाजिक संघटना, १३० ग्रामपंचायती, सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत रिफायनरी प्रकल्प राजापुरातच व्हावा यासाठी रविवारी (६ मार्च) समर्थन मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याच्या ठिकाणी काेणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दंगल नियंत्रण पथक हजर होते.कोकणाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्हाला या रिफायनरी प्रकल्पाची नितांत गरज आहे. यापूर्वी काही एनजीओंच्या भुलथापांना बळी पडून नाणार येथील स्थानिकांनी प्रकल्पाला विरोध केला होता. मात्र, आता ती चूक आम्ही पुन्हा करणार नाही, असे स्पष्ट करत धोपेश्वर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी या समर्थन मेळाव्याला हजेरी लावली होती.रिफायनरी प्रकल्प समन्वय समिती राजापूर - धोपेश्वरचे कार्याध्यक्ष महेश शिवलकर यांनी रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्याला काय सुविधा मिळणार आहेत याची माहिती प्रस्ताविकामध्ये दिली. राजापूर शहराला भेडसावणाऱ्या पुराच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रकल्प कंपनीने राजापूर शहरातून वाहणाऱ्या कोदवली व अर्जुना या नद्यांमधील गाळ काढावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.रिफायनरी प्रकल्पातून निघणाऱ्या कार्बनडाय ऑक्साइड या वायूपासून कार्बन सीट बनवल्या जातात. ही ग्रीन रिफायनरी आहे, त्यामुळे यातून प्रदूषण होत नाही. पर्यावरणाची सर्व मानके या प्रकल्पामध्ये पाळली जातात अशी माहिती रिफायनरीचे अभ्यासक आशिष किर यांनी यावेळी दिली. रत्नागिरीतील फिनोलेक्स कंपनीच्या वेळीही एनजीओ आले होते. मात्र, आता ते कुठेही दिसत नाहीत. एनजीओंच्या माध्यमातून काही लोक समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचे काम करत आहेत. त्यांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असेही आशिष किर यानी सांगितले.