चिपळूण : सुमारे दीड कोटी रुपयांची गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा ट्रक चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात पकडण्यात आला. सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. कोकणातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.
या ट्रकविषयी येथील पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार सोमवारी रात्री घाटातच हा ट्रक अडविण्यात आला. त्यानंतर रात्री दीड वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. ट्रकमध्ये लाकडी पट्ट्यांच्या बॉक्समध्ये सर्व माल सील केलेला होता. अखेर पोलिसांना हे लाकडी बॉक्स तोडावे लागले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू आढळली. या कारवाईत २५ हून अधिक पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. संबंधित ट्रक रात्री उशिरा खेर्डी औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात आणून ठेवला आहे. याप्रकरणी चालकासह दोघांना ताब्यात घेतले आहे.