रत्नागिरी : जिल्ह्यात बकरी ईद शांततेत साजरी झाली. कोरोना काळात होणाऱ्या या सणादरम्यान मुस्लिम बांधवांनी शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत बकरी ईदीच्या नमाज घरीच अदा केला.
कोरोनामुळे बकरी ईद घरीच साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज अदा केला आणि दूरध्वनी तसेच सोशल मीडियावरून एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
या अनुषंगाने जिल्ह्यात पोलीस दलाच्यावतीने शांतता समितीच्या २८ तसेच मोहल्ला समितीच्या ४७ बैठका घेण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात विविध ठिकाणी तपासणी नाकेही तैतान करण्यात आले होते. ईद शांततेत पार पडण्यासाठी मागील १० दिवसात जिल्ह्याच्या अभिलेखावरील ४२ हिस्ट्रीशिटर तसेच ६७ माहितीगार गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली.
गेल्या आठवड्यात विविध पोलीस स्थानकाच्या हद्दीत दंगा काबू योजनेच्या १७ रंगीत तालीम घेण्यात आल्या. त्याचप्रमाणे १९ जुलै संध्याकाळी ७ ते २० जुलै पहाटे ३ वाजेपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात ऑलआऊट ऑपरेशन राबवण्यात आले. या कारवाईअंतर्गत जिल्ह्यात एकूण ४३ ठिकाणी नाकाबंदी करून मोटार वाहन कायद्यान्वये १०६ केसेस करण्यात आल्या. सदर मोहिमेत जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, अन्य अधिकारी व अमलदार यांनी सहभाग घेतला होता.
पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली ५६ अधिकारी, ४४६ अमलदार, एस आर पीएफच्या २ तुकडया, २२२ होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. क्यूआरटी आरसीपी तसेच नियंत्रण कक्ष येथे राखीव पोलीस दल सतर्क ठेवण्यात आले होते.