रत्नागिरी : आखाती प्रदेशात ईद-उल-अजहा अर्थात् बकरी ईदचा सण मंगळवारी साजरा करण्यात येणार आहे. भारतात मात्र सर्वत्र बुधवार (२१ जुलै) रोजी ईद-ऊल-अजहा साजरी केली जाणार आहे.
इस्लामच्या पाच मुख्य तत्वांपैकी एक म्हणजे हजयात्रा. मक्का मदिना येथे जाऊन हजयात्रा पूर्ण केली जाते. सव्वा महिन्याचा कालावधी हजयात्रेसाठी लागतो. कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे गतवर्षीप्रमाणे यावर्षीही हजयात्रेला स्थगिती देण्यात आली आहे. पवित्र मक्का मदिना हज यात्रेकरूंसाठी बंद ठेवण्यात आले होते. मात्र, बकरी ईद अर्थात् ईद-उल-अजहा आखाती प्रदेशात मंगळवारी साजरी करण्यात येणार असून, भारतात सर्वत्र ईद बुधवारी असल्यामुळे मुस्लिम भाविक मंगळवारी ‘आरफत’चा रोजा ठेवणार आहेत. सोशल डिस्टन्सिंगमुळे ‘ईद-उल-अजहा’ची नमाज रमजान ईदप्रमाणे घरीच अदा करावी लागणार आहे.
बकरी ईदनिमित्त मुस्लिम बांधवांमध्ये कुर्बानी देण्याची प्रथा असून, ईदपासून पुढे दोन दिवस कुर्बानी देण्यात येते. सोशल डिस्टन्सिंग राखूनच कुर्बानीसाठी परवानगी देण्यात आली आहे. ईदसाठी मिष्टान्न म्हणून शीरखुर्मा, खीर शिजविण्यात येते. सोशल डिस्टन्सिंग राखूनच ईद शांततेत साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.