लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : देवळातल्या देवाची मूर्ती आपण नेहमीच पाहतो; पण माणसांमधला देव आपण महापुरानंतर पाहिला. पूरग्रस्तांच्या मदतीने असे हजारो देव उभे राहिले. या सर्वांचे दर्शन घेण्याची आणि त्यांचे ऋण व्यक्त करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो, असे गौरवोद्गार काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी काढले.
चिपळूणमधील पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या दानशूर संस्था आणि व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष साजीद सरगुरोह व मित्रपरिवार यांच्यातर्फे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी यादव बोलत होते. ते पुढे म्हणाले की, महापुरात अनेकांचे व्यवसाय, संसार उद्ध्वस्त झाले. पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी शहर, तालुका, जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेरील सामाजिक, धार्मिक संस्था आणि व्यक्तींनी धाव घेतली. शासन, प्रशासन पोहोचू शकले नाही, तिथे या दानशूर संस्था आणि व्यक्ती पोहोचल्या आणि त्यांनी पूरग्रस्तांना मदत देण्याचा प्रयत्न केला. मुस्लीम बांधवांपासून या कार्याची सुरुवात झाली. जात- पात- धर्म न पाहता प्रत्येक समाजातील संस्था आणि व्यक्तींनी केवळ मानवतेच्या भावनेतून पूरग्रस्तांची सेवा केली. केवळ संकटातच नव्हे, तर नेहमीच अशी एकीची भावना सर्वांच्या मनात कायम राहावी, असे आवाहनही यादव यांनी केले.
यावेळी पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या पुणे, मुंबई, रत्नागिरी, चिपळूण, गोवळकोट, सावर्डे येथील सामाजिक संस्था आणि व्यक्तींचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर यादव यांच्यासह चिपळूण मुस्लीम समाजाचे उपकार्याध्यक्ष यासीन दळवी, मौलाना कारी इद्रीस (पुणे), मजीद माखजनकर, मर्कजचे रत्नागिरी जिल्ह्याचे जिम्मेदार अझीम होडेकर, काँग्रेसचे चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे युवक अध्यक्ष महेश कदम उपस्थित होते. काँग्रेसचे चिपळूण तालुका उपाध्यक्ष साजीद सरगुरोह यांनी प्रास्ताविक, तर शाहीद खेरटकर यांनी सूत्रसंचालन केले.