मंडणगड : डाॅक्टर म्हणजे देवमाणूस हे आपण अनेक रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाइकांच्या तोंडून ऐकत आलो आहोत; पण मंडणगड शहरातील डॉ. आशिष जाधव यांनी संचारबंदीच्या काळात दररोज ५० गरजू लोकांना पोटाला पुरेल इतके अन्न देण्याचा संकल्प केला. त्याच्या या उपक्रमामुळे डाॅक्टरांतील एक वेगळा देवमाणूस सर्वांसमोर आला आहे.
सामाजिक जाणिवेने व स्वत: पदरमोड करीत त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. शहर परिसर व तालुक्यातील गरजू नागरिकांना अन्नदानाचा लाभ घेतला. डॉ. आशिष जाधव हे गेल्या पाच वर्षांपासून शहरात स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ म्हणून आपली वैद्यकीय सेवा बजावत आहेत. गेल्या वर्षभरापासून आलेल्या कोरोनामुळे बहुतांश लोकांवर उपासमारीचे संकट आले आहे.
तसेच काही तज्ज्ञांच्या मते या लॉकडाऊनमध्ये माणसं ही काेराेनाने कमी आणि उपासमारीने जास्त मरण पावतील. त्याचे गांभीर्य लक्षात घेत जाधव यांनी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत पोटाला पुरेल इतके अन्न पार्सल स्वरूपात दररोज ५० गरजू लोकांसाठी, तेही मोफत देण्याचा संकल्प केला आहे. पहिल्या दिवसाच्या प्रारंभाच्या छोटेखानी कार्यक्रमास डॉ. आशिष जाधव, माजी स्वीकृत नगरसेवक मुंजीर दाभीळकर, शिवसेना शहरप्रमुख विनोद जाधव, शिक्षक राजेश इंगळे, डॉ. विजय पेटकर, डॉ. अक्षय पाटणकर यांची उपस्थिती हाेती.