मेहरुन नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनामुळे दीड वर्षापासून रेल्वेस्थानकावर प्रवाशांव्यतिरिक्त नातेवाइकांना बंदी करण्यात आली आहे. शिवाय गेले वर्षभर रेल्वेस्थानक तिकीट दर वाढविण्यात आले आहेत. अन्य जिल्ह्यातील प्लॅटफाॅर्म तिकीट दर तीस रुपयांवरून दहा रुपये करण्यात आले असताना रत्नागिरी स्थानकावरील दर मात्र ‘जैसे-थे’ आहेत.
कोरोनामुळे रेल्वे सुरुवातीला बंद होत्या. मात्र, अनलाॅकनंतर मोजक्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या. परंतु, आरक्षण असेल तर प्रवासी प्रवास करू शकतात, अन्यथा प्रवेश रद्द करण्यात आला असल्याने प्रवाशांना सोडायला येणारे नातेवाईक स्थानकाबाहेरच थांबत आहेत. प्लॅटफाॅर्म तिकीट दरही कमी केलेले नाहीत. त्यामुळे नातेवाइकांना सोडायला जाणे अद्याप तरी परवडणारे नाही.
राेज १५० प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री
कोरोनापूर्वी दिवसाला शंभर ते दीडशे प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री सहज होत असल्याने चांगला महसूल प्राप्त होत होता.
गतवर्षी प्लॅटफाॅर्म तिकीट ५० रुपये करण्यात आले होते. मात्र, प्रवाशांच्या मागणीवरून ते ३० रुपये करण्यात आले.
मात्र, सध्या प्लॅटफाॅर्म प्रवेशच बंद असल्यामुळे रेल्वे प्रशासनाला दररोज मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.
प्लॅटफाॅर्मची गर्दी कमी
गणेशोत्सवापूर्वी मोजक्याच फेऱ्या सुरू होत्या. मात्र, दिवसाला सध्या ५० फेऱ्या धावत आहेत. दिवा-सावंतवाडी व दादर-रत्नागिरी या पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात आल्या असल्या तरी त्या आरक्षित आहेत. सर्व स्थानकांतून दोन्ही गाड्या थांबत असल्या तरी आरक्षण असेल तरच प्रवाशांना प्रवासाची संधी उपलब्ध आहे. त्यामुळे विना आरक्षण प्रवास करणाऱ्यांना चाप बसला आहे. सध्या तरी आरक्षण असलेले प्रवासी आरामात प्रवास करीत आहेत. आरक्षण तपासणी काटेकोरपणे केली जात असल्याने प्लॅटफाॅर्मवर भटकंतीसाठी येणाऱ्यांचीही संख्या कमी झाली आहे. अन्य जिल्ह्यांप्रमाणे प्लॅटफार्म तिकीट दर दहा रुपयांवर आणणे गरजेचे आहे. शिवाय प्लॅटफाॅर्म प्रवेश नातेवाइकांसाठी सुरू करण्याची मागणी होत आहे.
परदेशी किंवा विशेष यात्रेसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोडण्यासाठी नातेवाईक मोठ्या संख्येने रेल्वे स्थानकात येत असतात. त्यामुळे रेल्वे येईपर्यंत नातेवाईक थांबतात. साहजिकच प्लॅटफाॅर्म तिकीट काढावेच लागते. सुरुवातीला दहा रुपये असलेला दर अचानक ५० रुपये करण्यात आला. मात्र, प्रवाशांच्या मागणीनुसार तिकीट दर ३० रुपयांवर आणण्यात आले. आतापर्यंत ३० रुपये दर स्थिर आहे. अन्य जिल्ह्यांतील प्लॅटफाॅर्म तिकीट दर कमी करण्यात आले असताना रत्नागिरीतील दर मात्र अद्याप कमी केलेले नाहीत. परंतु, आरक्षण असलेल्या प्रवाशांनाच प्लॅटफाॅर्मवर प्रवेश देण्यात येत आहे. त्यामुळे विना तिकीट किंवा प्लॅटफाॅर्म तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लगाम बसला आहे.
सुरू असलेल्या रेल्वे
n कोकणकन्या एक्स्प्रेस
n मांडवी एक्स्प्रेस
n नेत्रावती एक्स्प्रेस
n मत्स्यगंधा एक्स्प्रेस
n जनशताब्दी एक्स्प्रेस
n तुतारी एक्स्प्रेस