रत्नागिरी : शिक्षक भरतीवरील बंदी उठविण्यात आल्याने आता जिल्ह्यातील शाळांमध्ये रिक्त पदांवर शिक्षक उपलब्ध होणार आहेत. जिल्हा परिषद शाळांसह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षक उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टळण्यास मदत होणार आहे.पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक पध्दतीने सन २०१७ पासून सुरू झालेली शिक्षक भरती अपूर्ण राहिली. त्यातच कोरोनाचे संकट उभे राहिले. मात्र, आता या भरतीवरील बंदी उठवण्यात आल्याने जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध होणार आहेत.
रत्नागिरीत परजिल्ह्यातील शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तीन वर्षे नोकरी करून आंतरजिल्हा बदली करून घेतली जात असल्याने अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त राहात आहेत. परिणामी जिल्हा परिषद शाळांऐवजी खासगी शाळांकडे ओढा वाढला आहे.अनेक पदे रिक्त असल्याने तज्ज्ञ शिक्षकांची कमतरता शाळांना भासते. जिल्ह्यातील अनुदानित हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालये यामध्ये गेली अनेक वर्षे शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.भरतीसाठी पवित्र पोर्टलचा पर्याय वापरण्यात आला. मात्र, २०१७ पासून प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये निवड यादी प्रसिध्द झाली होती. मात्र, मुलाखतीद्वारे होणाऱ्या भरती प्रक्रियेची यादी अद्याप जाहीर झालेली नाही.आरक्षणातील रिक्त जागा, विषय शिक्षकांच्या जागा व इतर रिक्त जागांसाठी भरती करण्याची प्रक्रिया सुरू असताना कोरोनामुळे भरती थांबली होती. आता पदभरती बंदीतून पवित्र प्रणालीतून होणारी बंदी उठविण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच भरती होण्याची आशा आहे.