रत्नागिरी : वाढत्या उकाड्याने नागरिकांना हैराण केले आहे. त्यामुळे मान्सूनची आतुरतेने प्रतीक्षा सुरू आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) गुरूवारी केरळात पावसाच्या आगमनाची आनंदाची बातमी दिली आहे. आठ दिवसांच्या विलंबानंतर मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून आता आमच्याकडे कधी येणार, ही कोकणवासियांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
साधारणत: १ जूनच्या दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होतो आणि साधारणत: आठवडाभरात तो कोकणात हजेरी लावतो. मात्र, यावेळी त्याचे केरळात आगमन विलंबानेच झाले. दक्षिण अरबी समुद्रावर पश्चिमेकडील वाऱ्यांचा वेग वाढल्याने परिस्थिती अनुकूल होत आहे. तसेच, पश्चिमेकडील वाऱ्यांची खोली हळूहळू वाढत असून या वाऱ्यांची खोली सरासरी समुद्रसपाटीपासून २.१ किमीपर्यंत पोहोचली आहे . केरळच्या किनारपट्टीवर मान्सून दाखल होण्यास आणखी तीन ते चार दिवस लागू शकतात, असा अंदाज आयएमडीने रविवारी व्यक्त केला होता. मात्र, मान्सूनने या अंदाजाला बगल देत केरळात प्रवेश केला आहे.
प्रत्येक क्षणाला हवामान बदलत आहे. काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी उकाड्याने नागरिकांना हैराण केले आहे. त्यामुळे लोक मान्सूनची आतुरतेने वाट पाहत होते. आठ दिवसांच्या विलंबानंतर का होईना मान्सून एकदाचा केरळमध्ये दाखल झाला आहे. यामुळे नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला आहे.
आता केरळात दाखल झालेला मान्सून आठवडाभरात कोकणात दाखल होणार आहे. हवामान विभागाने मान्सूनचा वेग मंदावेल असे म्हटले होते. मात्र, केरळात तीन चार दिवसांनी येणारा मान्सून आधीच आल्याने आता काेकणातही जलद गतीने येवो, असे आर्जव कोकणवासिय करीत आहेत.
गेल्या चार पाच दिवसांपासून आभाळ भरून येत होते. त्यामुळे पावसाचा शिडकावा होईल, अशी आशा वाटत होती. यंदा वळवानेही हुलकावणीच दिली होती. त्यामुळे पाऊस कधी येतो, असे वाटत होते. सगळ्यांचेच लक्ष आभाळाकडे लागले होते. शेवटी केरळात दाखल झालेल्या मान्सूनच्या आगमनाने सर्वत्र चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे.