प्रकाश वराडकर - रत्नागिरी शहराची विकासकामे साडेसातीच्या फेऱ्यातून बाहेर पडण्याची सुचिन्हे दिसू लागली आहेत. नवीन वर्षात रत्नागिरीकरांसाठी खुशखबर असून शहरातील मुख्य रस्ते येत्या महिनाभरात गुळगुळीत होणार आहेत. या डांबरीकरण कामांना येत्या १५ ते २० फेबु्रवारीदरम्यान आर. डी. सामंत कन्स्ट्रक्शन कंपनीकडून सुरूवात होणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून नगरपरिषद व सामंत कन्स्ट्रक्शनमधील वादळाचे ढग आता दूर झाले आहेत. आर. डी. सामंत कन्स्ट्रक्शन कंपनीने रत्नागिरी पालिकेची काही डांबरीकरणाची कामे २०१४ मध्ये स्वीकारली होती. जुनी बिले येत नसल्याने, नवीन कामांचा विचार होणे कठीण असल्याचे व काळ्या यादीत का टाकू नये, अशी पालिकेची नोटीस अमान्य असल्याचे सामंत कंपनीकडून कळवण्यात आले. त्यानंतर हा वाद वाढतच गेला. सामंत कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला व तशी शिफारस बांधकाम खात्याकडे करण्यात आली. हे प्रकरण सुरू असतानाच अन्य ठेकेदाराला रस्ता डांबरीकरणाची कामे देण्यात आली. परंतु, त्या कामांना सामंत कंपनीने न्यायालयात स्थगिती मिळविली.पालिका व सामंत कंपनीच्या या वादात रत्नागिरी शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे रखडली. अखेर आता पालिका व सामंत कंपनी यांच्यातील वाद निवळला असून, २१ कोटींच्या रखडलेल्या रस्ता डांबरीरकरणाच्या कामांना आता वेग येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राधान्याने येत्या पंधरवड्यात जी रस्ता कामे सुरू केली जाणार आहेत. दांडा फिशरिज ते साळवी स्टॉप या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम होणार असून त्यासाठी ७ कोटी ९० लाख रुपयांचा खर्च येणार आहे. मारुती मंदिर ते नाचणादेवी मंदिरपर्यंतच्या रस्ता कामासाठी ४ कोटी, साळवी स्टॉप ते नाचणे रस्ता डांबरीकरणासाठी २ कोटी तर मारुती मंदिर ते किस्मत बेकरीपर्यंतच्या रस्त्यासाठी दीड कोटी रुपये खर्च येणार आहे. एकंदर शहरातील रस्ते गुळगुळीत होणार हे नक्की. नगरविकास राज्यमंत्री येणारखरेतर, येत्या ८ फेबु्रवारीपासूनच डांबरीकरण कामाला सुरुवात होणार होती. मात्र, या कामाचे भूमिपूजन मंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. नगरविकास राज्यमत्र्यांच्या हस्ते या रस्ता डांबरीकरणाचा आरंभ होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सामंत कंपनीकडे २१ कोटींची कामे देण्यात आली असली, तरी प्रथम १५ कोटींची कामे तातडीने केली जाणार आहेत.
जलवाहिनी बदलासाठी खोदाईमुख्य रस्त्यांचे डांबरीकरण येत्या पंधरवड्यात सुरू होणार असल्याने, रस्त्यांखालून जाणाऱ्या नादुरुस्त जलवाहिन्या बदलण्याचे काम वेगात सुरू झाले आहे. पालिकेच्या पाणी विभागामार्फत जागोजागी रस्ते खणून नादुरूस्त जलवाहिन्या बदलण्याचे काम गेल्या दोन दिवसांपासून वेगात सुरू आहे. रस्त्यांचे डांबरीकरण झाल्यानंतर, पुन्हा या कामासाठी रस्ते खणले जाता नयेत, ही भूमिका ठेवूनच ही कामे केली जात आहेत. मात्र, या कामांमुळे आरोग्यमंदिर, मारुतीमंदिर तसेच मजगाव रस्ता तिठ्यावर गेल्या दोन दिवसांत वाहतूकीची कोंडी होते आहे.