पावस येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात ४५ वर्षांवरील नागरिकांनी लसीकरणासाठी गर्दी केली हाेती. (छाया : दिनेश कदम)
लाेकमत न्यूज नेटवर्क
पावस : रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आतापर्यंत ६४० जणांनी कोविडची लस घेतली आहे. केंद्रात १ एप्रिल २१ पासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्यात येत आहे. या लसीकरणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
यापूर्वी गोवरची लस, रक्तदाब, फुप्फुस, हृदयासंबंधी तसेच इतर आजार, कॅन्सर, एड्स असे आजार असणाऱ्या लोकांना ही लस दिली जात होती. तथापि, १ एप्रिल २०२१ पासून आजार असणारे तसेच आजार नसणारे ४५ वर्षांवरील सर्वांना कोविड लस दिली जाणार आहे.
यासाठी कोविड १९ ग्राम कृतीदल, आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा यांच्या मदतीने दिलेल्या नियोजित तारखांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित राहावयाचे आहे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. डी. कांबळे यांनी केले आहे.