चिपळूण : काही दिवसापुर्वी शहरातील डीबीजे महाविद्यालयाच्या आवारातील संरक्षक भिंत अतिवृष्टीमुळे कोसळून दापोली देगाव येथील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्याच दरम्यान डेरवण येथील विद्यार्थीनीचाही सावर्डेतील कापशी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या दोन्ही घटनेतील मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत प्रत्येकी ४ लाख रूपयांची आर्थिक मदत शासनाकडून देण्यात आली आहे. येथील डीबीजे महाविद्यालयात वाणीज्य पदवी शाखेत द्वितीय वर्षात शिकत असलेला सिद्धांत प्रदीप घाणेकर ( १९, सध्या रा. लोटे, खेड, मुळ रा. देगाव, दापोली ) हा डीबीजे महाविद्यालयाच्या परिसरात महामार्गालगत एका टपरीजवळ भर पावसात उभा होता. याचवेळी महाविद्यालयाच्या आवारातील जाभ्यांची संरक्षक भिंत अचानक कोसळली. या भिंतीखाली सिद्धांत घाणेकर हा विद्यार्थी चिरडला गेला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. चोवीस तासानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर या विद्यार्थ्याच्या कुटुबियांना तातडीने महाविद्यालयाकडून आर्थिक मदत देण्यात आली. त्याचवेळी प्रशासनाने आपत्कालीन परिस्थिती अंतर्गत शासनाची आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केला. त्यानुसार या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांना ४ लाख रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. डेरवण बौध्दवाडीत राहणारी आणि मूळ संगमेश्वर या तालुक्यातील कळबस्ते या गावात राहणारी श्रावणी सुधीर मोहीते (१४ ) ही विद्यार्थ्यींनी डेरवण येथे आपल्या आजोळीच शिक्षणा निमित्त राहत होती. तिच्या सोबत तिची आई व छोटी बहीण देखील तेथेच राहत होते. मात्र काही दिवसांपुर्वी मुसळधार पावसात घरा नजीकच्या ओढ्यावरील लोखंडी साकवावरुन पलीकडे जात असताना ती पाय घसरून ओढ्यात पडली. मुसळधार पाऊस आणि ओढ्याच्या वाहत्या पाण्यातून ती वाहत गेली. ती वाहून जात असताना काही ग्रामस्थांनी तिला पाहीले. परंतु त्या वाढत्या प्रवाहात ती काही सेकंदातच दिसेनाशी झाली. हा ओढा पुढे सावर्डे येथील कापसी नदीला जाऊन मिळतो. त्या कापशी नदीच्या पात्रात सुमारे सव्वा तासानंतर तिचा मृतदेह आढळून आला होता. श्रावणी मोहिते हिच्या कुटुंबियांना काही दिवसापुर्वीच डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या माध्यमातून २५ हजाराची आर्थिक मदत दिली होती. त्यानंतर आता शासनाकडून तिच्या कुटुंबियांना ४ लाख रूपयांची मदत देण्यात आली आहे. तहसीलदार प्रविण लोकरे यांनी तत्परतेने या दोन्ही विद्यार्थ्याना शासनाकडून मदत मिळण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
Ratnagiri: मृत 'त्या' दोन विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४ लाखाची शासकीय मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 4:35 PM