सध्या कोविड उपचारासाठी खासगी रुग्णालये निर्माण होऊन यात कोटीची गुंतवणूक झाली आहे. हा एक धंदाच बनून राहिला आहे. त्यामुळेच शासकीय रुग्णालये नागरिकांना आपलीशी वाटू लागली आहेत. उलट शासकीय रुग्णालयात कधी नव्हे ते रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता सरकारी रुग्णालयाबाबत अशापद्धतीने विश्वासार्हता कमी झाली, तर या खासगी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचा ओघ वाढेल अशी शक्यता आहे आणि म्हणून हे जाणीवपूर्वक होत असावे, असेही म्हटले तर गैर ठरणार नाही. त्याचे कारण असे की, कामथे रुग्णालयात साफसफाई पासूनचे रुग्णाच्या आहारापर्यंतचे प्रश्न निर्माण झाले आहेत. या रुग्णालयातील आणि इतरही शासकीय रुग्णालयातील काही वैद्यकीय मंडळी आपली खासगी रुग्णालये, डिस्पेन्सरी थाटून धंदा करून राहिले आहेत. चिपळूणमधील आणि लगतच्या गावातील गरीब रुग्णांना खासगी उपचार परवडणारे नाहीत. त्यासाठी नागरिकांनी शासकीय रुग्णालय ‘आपलं आहे’ असं समजून अशा घटनांची दखल घ्यावयास हवी आहे. हेच जर दोन श्वान व्हिडिओ घेणाऱ्या व्यक्तीच्या घरातील बेडवर झोपलेले आढळले असते तर त्यानं काय केलं असतं? असं शूटिंग करून सोशल मीडियावर फिरवलं असतं. तेव्हा अशा गोष्टी करताना संबंधितांनी जरा भान ठेवायला हवे. आपण असं कृत्य करून काहींचा लाभ व्हावा. या उद्देशाने काम तर करीत नाही ना, याचीही प्रत्येकाने जाणीव ठेवायला हवी. आज शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अशावेळी केवळ आरोग्य यंत्रणेबरोबरच रुग्णालयाची वास्तूही सुरक्षित ठेवायला हवी. किमान इमारत व परिसर बंदिस्त असावा, इतकेच अपेक्षित आहे.
- संदीप बांद्रे