संदीप बांद्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, चिपळूण: कोकणात लोककलेची समृध्द परंपरा आहे. कोकणात पर्यटनाच्या अमर्याद संधी आहेत. यासाठीच कोकण विकास विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. या माध्यमातून संपूर्ण कोकणाचा कायापालट कालबध्द रीतीने होऊ शकतो. मुंबई ते सिंधुदुर्गपर्यंत ग्रीनफिल्ड रस्ता तयार झाल्यास पर्यटन वाढीस चालना मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. चिपळूण येथील श्रीजुना कालभैरव मैदानावर ५ ते ८ फेबुवारी दरम्यान पर्यटन, लोककला, सांस्कृतिक, खाद्य महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या वेळी कार्यक्रमस्थळी राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, संयोजन समिती अध्यक्ष तानाजी चोरगे, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे मार्गदर्शक प्रकाश देशपांडे, आमदार शेखर निकम, आमदार प्रसाद लाड, आमदार योगेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, लोककलावंत प्रभाकर मोरे, ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत होऊन गेलेल्या रत्नांचे लोककला प्रदर्शनात लावलेल्या तैलचित्रांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या तैलचित्रांमध्ये धर्मवीर आनंद दिघे यांच्या तैलचित्राचा समावेश करण्यात आला आहे.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, लोककला महामंडळ स्थापन करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. लोककला महोत्सवामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल. गेल्या सहा महिन्यांत या शासनाने अनेक लोकहिताचे निर्णय घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कोंकण भूमीतील गडकिल्ले, सागरी किनारे,निसर्गसंपन्न वातावरण हे कोकणचे वैभव आहे. मुंबई ते गोवा जुना महामार्ग देखील वेगाने तयार होत आहे. कोकणची वैशिष्ट्ये अधोरेखित करणाऱ्या पर्यटन, लोककला, सांस्कृतिक आणि कोकणी खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्राला किंबहुना भारताला कोकणचा सर्वांगीण परिचय व्हावा, हा या महोत्सवामागचा मुख्य उद्देश आहे. वाढत्या मोबाईल वापराने लोककला महोत्सवामुळे तरुण पिढी याकडे वळतील. असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मंत्री उदय सामंत म्हणाले की, मूळ कोकणातून सर्व कलाक्षेत्रात प्रसिद्धी मिळालेल्या लोककलाकारांनी कोकणातील नवोदित कलाकारांना सहकार्य करून त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी मदत करावी. असे लोककला महोत्सव रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात व्हावे आणि ही परंपरा वर्षानुवर्षे चालत राहावी. यासाठी लागेल ते अर्थसहाय्य करण्याची ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली. श्री जुना कालभैरव मंदिर अंतर्गत कै. बापू बाबाजी सागावकर मैदानावर उभारण्यात आलेल्या सह्याद्रीनगरात हा महोत्सव होणार आहे. हा महोत्सव कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य खुला आहे.