शोभना कांबळे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शासनाच्या निराधार निवृत्तीवेतन योजना विभागाच्या पाच विविध निवृत्तीवेतन योजनेतील जिल्ह्यातील ४२ हजार ८२९ लाभार्थ्यांना दोन महिन्यांकरिता प्रत्येकी एक हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य शासनाकडून आगाऊ देण्यात येणार आहे.
निराधारांसाठी केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी वृद्धापकाळ वेतन योजना, इंदिरा गांधी विधवा वेतन योजना, इंदिरा गांधी दिव्यांग वेतन योजना या तीन योजना आहेत. तर राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ निराधार योजना अशा तीन योजना आहेत. या योजनेंतर्गत निराधार व्यक्तींना मासिक एक हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या पाच योजनेेचे जिल्ह्यातील एकूण ४२ हजार ८२९ लाभार्थी आहेत.
लाॅकडाऊनच्या काळात या निराधार व्यक्तींची हेळसांड होऊ नये, त्यांची गैरसोय होऊ नये, या हेतूने शासनाने या पाचही योजनांच्या लाभार्थ्यांना दोन महिन्यांकरिता प्रत्येकी एक हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य आगाऊ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे शासनाच्या योजनेचा लाभ जिल्ह्यातील या पाच योजनांचे लाभार्थी असलेल्या एकूण ४२,८२९ निराधारांना मिळणार आहे.
लाभार्थी म्हणतात...
आम्हांला कुणाचा आधार नाही. त्यामुळे शासन देईल, त्यावर आमची गुजराण सुरू आहे. त्यामुळे शासनाने आमची दखल घेत आता लाॅकडाऊन काळात आम्हाला दोन महिन्याचे प्रत्येकी हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. त्यामुळे आम्हाला या काळात खूपच मदत हाेणार आहे. त्याबद्दल आम्ही शासनाचे आभारी आहोत.
- आनंदी राडे, लाभार्थी, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना
दिव्यांगांसाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्याचा लाभ अनेक दिव्यांग घेत आहेत. आता लाॅकडाऊनच्या काळातही शासनाने दिव्यांगांचा विचार करून दोन महिन्यांसाठी दोन हजार रुपयांची मदत करणार आहे. त्यामुळे या काळात त्याची खूप मदत होणार आहे. याबद्दल शासनाला आम्ही धन्यवाद देतो.
- मनोहर रोडे, लाभार्थी, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना
आतापर्यंत शासनाने आमच्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळेच निराधारांना जगणे सुसह्य होत आहे. लाॅकडाऊनच्या काळात अडचण होणार नाही, यासाठी शासनाकडून दोन महिन्याचे प्रत्येकी एक हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्यामुळे या काळात आम्हाला त्याची मदत होईल.
- पांडुरंग कांबळे, लाभार्थी, संजय गांधी निराधार योजना
शासनाची सध्या मला प्रत्येक महिन्याला एक हजार रुपयांची मदत होत आहे. त्यामुळे माझ्या लहान मुलांचे पालनपोषण करीत आहे. लाॅकडाऊन काळात माझ्या मुलांचे हाल झाले असते. मात्र, आता शासन दोन महिने एक एक हजार रुपयांची मदत करणार आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
- ललिता करंबेळे, लाभार्थी, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती योजना
मला मूलबाळ नसल्याने वृद्धापकाळात मला कुणाचा आधार नव्हता. पण आता गेल्या पाच वर्षांपासून शासनाची पेन्शन सुरू झाली आहे. काही वेळा ही पेन्शन उशिरा मिळते. लाॅकडाऊनमध्ये शासनाकडून दोन महिन्यांची पेन्शन आधीच मिळणार असल्याने या काळात आमची गैरसोय होणार नाही.
- यशोदा फेफडे, लाभार्थी, श्रावणबाळ निराधार योजना