रत्नागिरी : जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या कुशल कार्यपद्धतीमुळे प्रशासकीय स्तरावर झालेल्या शासकीय आणि विनंती बदल्यांबाबत कर्मचारी वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून, महिला कर्मचारी वर्गाला यामुळे विशेष दिलासा मिळाला आहे. जिल्हा प्रशासनातील १०५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत अव्वल कारकून, मंडल अधिकारी, लिपीक आणि शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश रात्री उशिरा काढण्यात आले. यामध्ये ३ वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या शासकीय बदल्या तसेच विनंती बदल्यांचा समावेश आहे. या बदल्यांचे वारे मंगळवारपासून वाहू लागताच प्रत्येकाला आपल्याला कुठे बदली मिळेल, याची धास्ती वाटत होती. विनंती बदल्यांसाठी अर्ज केलेल्यांना आपल्याला अपेक्षित ठिकाणी बदली मिळेल ना, अशी शंका सतावत होती. विशेषत: महिलावर्गाला आपली बदली इतरत्र झाली तर काय करायचे, ही भीती वाटत होती. त्यातच काहींची मुले लहान असल्याने दूरच्या ठिकाणी जावे लागले तर काय करायचे, हा सवाल त्रस्त करत होता. रत्नागिरीबाहेर याआधी कार्यरत असलेल्या महिलांनी यावेळी विनंती बदली मागून घेतली होती. जिल्हाधिकारी प्रदीप पी. आणि निवासी उपजिल्हाधिकारी सारंग कोडोलकर यांनी या सर्व बदल्यांबाबत सकारात्मकता दाखवत बहुतांशी विनंती बदल्या मंजूर केल्याने महिला कर्मचारी वर्गाला विशेष दिलासा मिळाला आहे. तसेच अन्य बदल्यांनाही योग्य न्याय दिल्याने कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. ५२ अव्वल कारकून, १८ मंडल अधिकारी, ३४ लिपीक आणि नाईक अशा एकूण १०५ कर्मचाऱ्यांच्या शासकीय व विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. श्रेणी १ व २ अधिकाऱ्यांच्या बदल्याही आता लवकरच शासनस्तरावरून होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
शासकीय, विनंती बदल्यांत जिल्हाधिकाऱ्यांचा दिलासा
By admin | Published: June 02, 2016 12:43 AM