आबलोली : अत्यावश्यक सेवेतील व्यापारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या काेराेना चाचणीचे अहवाल वेगवेगळे आल्याचा धक्कादायक प्रकार गुहागर तालुक्यातील आबलाेली येथे घडला आहे. शासकीय अहवालात पाॅझिटिव्ह येणाऱ्या व्यापाऱ्यांचे खासगीतील अहवाल मात्र निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे या चाचणीतील नेमके गाैडबंगाल काय, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.
शासनाने जाहीर केलेल्या लाॅकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास नियमांच्या चौकटीत राहून परवानगी देण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या आस्थापनांचे मालक, कर्मचारी यांच्याकडे कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र गरजेचे आहे. त्या अनुषंगाने अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या आस्थापनांचे मालक, कर्मचारी यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन ग्राम कृती दल, प्रशासनातर्फे करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत गुहागर तालुक्यातील आबलोली येथील व्यापारी, कर्मचाऱ्यांनी आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आरटीपीसीआरसाठी आपले स्वॅब दिले. त्यामध्ये काही व्यापाऱ्यांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. परिणामी तातडीने आबलोली बाजारपेठ सोमवारपर्यंत पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोरोना पाॅझिटिव्ह आलेल्या व्यापाऱ्यांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने त्यातील काही जणांनी डेरवण रुग्णालय येथे जाऊन पुन्हा आपली खासगी आरटीपीसीआर चाचणी करून घेतली. त्यामध्ये या सर्व व्यापाऱ्यांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले. सध्या हे व्यापारी गृह अलगीकरणात आहेत. कोरोना अहवालातील फरकामुळे आबलोली परिसरातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काेराेना चाचणी केल्यानंतर येणारे अहवाल खरे की खाेटे असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.