रत्नागिरी : कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी खासगी कोविड रुग्णालयांसाठी शासनमान्य दरपत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता या रुग्णालयांवर प्रशासनाच्या त्रिसदस्यीय समितीचे नियंत्रण राहणार असल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयांमधील सुविधा अपुऱ्या पडत आहेत. तसेच डॉक्टर, परिचारिका आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने आरोग्य सेवा देण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे सध्या काही खासगी डॉक्टरांचे तसेच खासगी रुग्णालयांचे सहकार्य घेण्यात येत आहे. रुग्णसंख्या भरमसाठ वाढू लागल्याने अत्यावश्यक सुविधा उपलब्ध असलेली काही खासगी रुग्णालये अधिग्रहीत करण्यात आली आहेत.मात्र, काही ठिकाणी कोरोना रुग्णांकडून दामदुप्पट बिल घेतले जात असल्याच्या तक्रारी दाखल येऊ लागल्या आहेत. याचे कारण देताना काही खासगी डॉक्टर किंवा रुग्णालये याबाबत शासनाचे दरपत्रक निश्चित झाले नसल्याचे सांगत पळवाट शोधू लागले होते.
यामुळे रुग्ण आणि खासगी डॉक्टर अथवा रुग्णालये यांच्यात मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण होऊ लागले होते. अखेर या बाबीची दखल घेत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी डॉक्टर किंवा रुग्णालये यांच्यासाठी शासनमान्य दरपत्रक जाहीर करण्यात आले आहे.या दरपत्रकाची अंमलबजावणी होते किंवा नाही, हे पाहण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आरोग्य अधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांचा समावेश असलेली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही समिती अशा खासगी रुग्णालयांची नियमित तपासणी करणार असून, या शासनमान्य दरपत्रकानुसार बिलाची आकारणी केली जाते आहे किंवा नाही, यावर लक्ष ठेवणार आहे.
त्यामुळे आता अव्वाच्या सव्वा बिल आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांवर प्रशासनाचे लक्ष राहणार आहे. भरमसाठ बिल घेत असल्याचे निदर्शनास आल्यास रुग्णांनाही तक्रार निवारण केंद्राकडे तक्रार दाखल करता येणार आहे.समावेश असलेल्या बाबी...रूग्णाची नियमित देखभाल, रक्त व लघवी तपासणी, सोनोग्राफी, टू डी इको, एक्सरे, इ. सी. जी. आदी तपासण्या, मर्यादित किरकोळ औषधे, डॉक्टर्स तपासणी, रूग्णबेड चार्जेस, नर्सिंग चार्जेस, जेवण, छोटे उपचार (उदा. नाकातून नळी टाकणे, कॅथेटरचा वापर)असे आहेत एका दिवसाचे दर...
- सामान्य कक्ष (जनरल वॉर्ड) तसेच विलगीकरण - ४००० रूपये
- अतिदक्षता विभाग(आय. सी. यु.) व्हेंटीलेटरशिवाय तसेच विलगीकरण ७५०० रूपये
- अतिदक्षता विभाग(आय. सी. यु.) व्हेंटीलेटरसह तसेच विलगीकरण ९००० रूपये