शोभना कांबळेरत्नागिरी : सरपंच, उपसरपंच निवड इतर निवडून आलेल्या सदस्यांमधून होत असली तरी शासनाचे मानधन केवळ सरपंच आणि उपसरपंच यांना मिळते. सदस्यांना मासिक बैठकीचा भत्ता दिला जातो.ग्रामपंचायतीचा डोलारा सरपंचाला सांभाळावा लागतो. गावाच्या कामांसाठी सरपंचाला ग्रामपंचायतीत दर दिवशी उपस्थित राहावे लागते. त्यामुळे शासनाकडून २००० पर्यंतची लोकसंख्या असेल त्या ठिकाणी सरपंच - उपसरपंच यांना अनुक्रमे ३०००, १००० तसेच ८००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या ठिकाणी ४००० आणि १५००, तर ८००० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंच यांना अनुक्रमे ५००० आणि २००० रुपये इतके मानधन आहे. सरपंच - उपसरपंच निवडून देणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांना मासिक बैठकीचा भत्ता केवळ २०० रुपये आणि चहापानावर समाधान मानावे लागणार आहे.सरपंच म्हणजे गावचा अनभिषिक्त राजा. शासनाच्या आलेल्या निधीचा विनीयोग, ग्रामस्थांना आवश्यक असलेल्या दाखल्यांवर सह्या करणे, गावचा कारभार सांभाळणे ही मुख्य कामे सरपंचाची असल्याने त्याने ग्रामपंचायतीत दरदिवशी उपस्थित रहाणे अपेक्षित असते. त्याच्या गैरहजेरीत उपसरपंच कारभार पाहातो. त्यामुळे शासनाकडून या दोघांना मानधन मिळते. मात्र, सदस्य मासिक सभेलाच उपस्थित राहात असल्याने त्यांना शासनाकडून बैठकीचा भत्ता दिला जातो.
गावाच्या कामांसाठी सरपंचाला दरदिवशी ग्रामपंचायतीशी संपर्क ठेवणे आवश्यक असते. ही कामे त्याला ग्रामसेवकासोबत राहून करावी लागतात. सरपंचांच्या अनुपस्थितीत उपसरपंच ग्रामपंचायतीचा कारभार पाहतो. त्यामुळे शासनाकडून या दोघांना मानधन दिले जाते. सदस्यांचाही विचार करणे आवश्यक आहे.- बापू शेट्ये,सरपंच कोंडगाव, साखरपा, ता. संगमेश्वर
ग्रामीण भागातील सरपंच, उपसरपंच यांना रोजगाराचे कुठलेच साधन नसते. तसेच या दोघांना ग्रामपंचायतीत नियमित उपस्थित राहावे लागते. मात्र, सदस्यांना केवळ महिन्याच्या बैठकीसाठी ग्रामपंचायतीत यावे लागते. त्यामुळे त्यांना केवळ महिन्याच्या बैठकीचा भत्ता दिला जातो. परंतु सदस्यांच्या भत्त्यातही वाढ व्हायला हवी.- प्रशांत पाटील,नूतन सरपंच, कोळंबे
ग्रामपंचायतीचा कारभार सरपंच आणि त्याचे इतर सदस्य यांच्यावर अवलंबून असतो. सध्या सरपंच आणि उपसरपंच यांना मानधन दिले जात आहे. मात्र, इतर सदस्यांना केवळ महिन्यातून एका बैठकीचा भत्ता दिला जातो. हा भत्ता शासनाने वाढवून द्यायला हवा. कारण हे सदस्य कुठल्या कामासाठी जाताना काही वेळा आपला खर्च करतात.- संजय पाटोळे,सरपंच, तळवडे