दापोली : तालुक्यातील अडखळ ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये १५ व्या वित्त आयोगांतर्गत कौशल्य विकास योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या अंतर्गत नारीशक्ती सोशल फाऊंडेशन गोकुळ शिरगाव आणि ग्रामपंचायत अडखळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील ३५ महिलांसाठी शिवण क्लास सुरू करण्यात आले आहेत.
कार्यक्रमाचे उद्घाटन अडखळ सरपंच रवींद्र घाग यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रकल्प अधिकारी रसिका आंबेकर, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष जहुर कोंडविलकर, ग्रामपंचायत सदस्य सचिन कदम, अंजली मळेकर, मनाली चौधरी, दर्शना कदम, रमिझा काझी, दापोली तालुका संपर्क प्रतिनिधी निकिता बालगुडे, मास्टर ट्रेनर सना काझी, अस्मा वाकणकर, दिनेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
गावागावांत कौशल्य विकास योजनेतून अधिकाधिक रोजगार उपलब्ध करणे, हा मुख्य उद्देश यामागे असून यातूनच ग्रामीण भागात आर्थिक क्रांती होईल, अशी आशा व्यक्त करत उपस्थित मान्यवरांनी या योजनेचा जास्तीत जास्त ग्रामस्थांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. अडखळ ग्रामपंचायत क्षेत्रातील ३५ महिलांनी शिवण क्लासमध्ये भाग घेतला असून, हे प्रशिक्षण एक महिन्याचे आहे.