मनोज मुळ्येरत्नागिरी : कुठे बिनविरोध, तर कुठे निवडणुकीने गावकारभारी ठरले. त्यापाठोपाठ आता उपकारभारीही आपापल्या खुर्चीवर बसले. आता लोकांना प्रतीक्षा आहे ती गाव विकासाची. यावेळी बहुतांश गावांनी आपले लोकप्रतिनिधी बिनविरोध निवडले असल्याने आता ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबतच्या तक्रारी कमी होण्याची अपेक्षा केली जात आहे.डिसेंबरमध्ये जिल्ह्यात २२२ पैकी एका ठिकाणच्या बहिष्कारामुळे २२१ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात एकूण ५८ ग्रामपंचायतींमधील सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले. १६३ ग्रामपंचायतींमध्येच निवडणूक झाली. गेल्या आठवड्यात २२१ उपसरपंचांच्या निवडणुका झाल्या असून, आता नव्यांचा कारभार सुरू झाला आहे.
आता करा सुरू कारभार
- सरपंच ठरले, उपसरपंचही खुर्चीत विराजमान झाले. आता गावची विकासकामे तातडीने हाती घेतली जावीत, अशी लोकांची अपेक्षा आहे.
- ज्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तेथे लोकांची अपेक्षा अधिक आहे. लोकांच्या या विश्वासामुळे तेथील सर्वच कारभाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे.
सरपंचपदाला महत्त्ववित्त आयोगातून ग्रामपंचायतीला थेट मिळणाऱ्या निधीमुळे आता ग्रामपंचायतींकडे सर्वच पक्ष विशेष लक्ष देत आहेत. त्यातच सरपंच निवडणूक थेट होत असल्याने त्याचे महत्त्व वाढले आहे.
गटातटाचा कंटाळागेल्या काही वर्षांत राजकारण गावपातळीपर्यंत झिरपले आहे. त्यातून गावागावांत गटातटाचे राजकारण वाढले आहे. त्याला कंटाळूनच यावेळी अनेक गावांनी आपले कारभारी बिनविरोध निवडले आहेत.
बिनविरोध निवडी अधिकजिल्ह्यात २२२ पैकी ६७ सरपंच बिनविरोध निवडून आले. थेट सरपंच निवडणूक, त्यातील वाढलेले राजकीय स्वारस्य, तरीही गावांनी एकमताने सरपंच निश्चित करणे याला खूप महत्त्व आले आहे. सदस्यांच्या १७६६ पैकी तब्बल ११०० सदस्य बिनविरोध निवडून देण्यात आले.
पारदर्शक कारभाराची अपेक्षावित्त आयोगाच्या निधीमुळे ग्रामपंचायतींकडील पैशाचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढला आहे.मिळणाऱ्या पूर्ण निधीचा विनियोग विकासकामांसाठीच व्हावा आणि कारभार पारदर्शक असावा, अशी अपेक्षा आता लोक करत आहेत.