रत्नागिरी : जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती असून ६२७ ग्रामसेवक आहेत. कोरोनापासून गाव सुरक्षित ठेवण्यासाठी ग्रामसेवकांकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. ग्रामस्थांना विविध सोईसुविधा पुरविण्यापर्यंतची कामे ग्रामसेवकांना करावी लागत आहेत. ग्रामसेवकांच्या या कामगिरीबद्दल जिल्हा परिषद प्रशासनाकडून कौतुक करण्यात येत आहे.
रक्तदान शिबिर
चिपळूण : शिरगाव येथील लिबर्टी एकता युवा मंच व एस. ए. फिटनेस यांच्या वतीने दिनांक २० मे रोजी ग्रामपंचायत सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता शिबिर सुरू होणार आहे. कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा भासत असून, त्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रस्त्याचे नूतनीकरण
रत्नागिरी : तालुक्यातील गावखडी ते पावस सागरी महामार्गावरील रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र साईडपट्टीचे काम अपूर्ण आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने रस्ता खड्डेमुक्त झाला आहे. ठेकेदाराकडून दुर्लक्ष झाल्याने साईडपट्टीचे काम पूर्ण झालेले नाही.
ऑनलाईन स्पर्धा
दापोली : येथील सायकलिंग क्लबतर्फे जिल्हास्तरीय ऑनलाईन निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विविध पाच गटांत स्पर्धा होणार असून, सहभागी स्पर्धकांना ई प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. २० मेपर्यंत निबंध व चित्र पाठविण्याचे आवाहन करण्यात आले असून, संस्थेशी संपर्क साधण्याची सूचना करण्यात आली आहे.
सुर्वे यांची निवड
रत्नागिरी : तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी राजन सुर्वे यांची निवड प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. प्रदेश सरचिटणीस शिवाजी गर्जे यांनी पत्राद्वारे याबाबतच्या सूचना जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांना देण्यात आल्या आहेत. गेले काही दिवस तालुकाध्यक्षपद रिक्त होते.
आयसोलेशन केंद्र
खेड : तालुक्यातील वावे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात कोविड रुग्णांसाठी आयसोलेशन केंद्रास मान्यता मिळाली आहे. त्यानुसार साखर माध्यमिक विद्यालयात २० बेडचे आयसोलेशन केंद्र उभारण्यात येणार आहे. रुग्णांची जेवण व्यवस्था स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तींमार्फत करण्याचे नियोजन आहे.
टँकरद्वारे पाणीपुरवठा
खेड : तालुक्यातील पोयनार, बौद्धवाडी, मधलीवाडी येथील ग्रामस्थांसाठी पंचायत समिती सभापती मानसी जगदाळे व जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. पाणीटंचाई भेडसावत असल्याने टँकरची मागणी करण्यात आली होती.