चिपळूण : भाजल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या ग्रामसेविका वासंती पाटील यांचा बुधवारी मृत्यू झाला आहे. त्यांना उपचारासाठी मुंबई ऐरोली येथे नेण्यात आले होते. मात्र, उपचारानंतर घरी नेण्यात येत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
वासंती पाटील (३०, मूळ गाव धुळे) या शहरातील बापटआळी परिसरातील एका सदनिकेत भाड्याने राहत होत्या. गुहागर तालुक्यातील तळसर-मुंढे येथे त्या ग्रामसेवक म्हणून कार्यरत होत्या. भाजल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. येथील एका खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर, अधिक उपचारासाठी त्यांना मुंबई येथे नेण्यात आले होते. तेथे उपचार झाल्यानंतर त्यांचे नातेवाईक त्यांना गावी नेत होते. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला त्या गॅसचा भडका उडाल्याने भाजल्याचे बोलले जात होते. मात्र, पोलिसांनी त्या राहत असलेल्या भाड्याच्या घराची पाहणी केली असता, त्यांनी जाळून घेत आत्महत्या केली असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
वासंती पाटील या चार वर्षांपूर्वी ग्रामसेवक म्हणून नोकरीत रुजू झाल्या होत्या. त्या मूळच्या धुळे येथील आहेत. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या आईचे निधन झाले होते. पतीचा सुरत येथे कपड्याचा व्यवसाय आहे.