रत्नागिरी : दादाचा रमजानचा रोजा होता. प्रणय मला व दादाला घेऊन चालत भाट्ये समुद्र किनाऱ्यावर घेऊन गेला. खेकडे पकडत असताना अंघोळीसाठी दोघे पाण्यात उतरले. मलाही पाण्यात येतो का विचारले. मात्र, मी भीती वाटते असे सांगून नकार दिला व किनाऱ्यावर बसून राहिलो. तेवढ्यात दोघे बुडू लागले.मी मदतीसाठी आरडाओरडा केला. लोक धावूनही आले. मात्र, दादाच्या पोटात पाणी व वाळू गेली होती. लोकांनी खूप धावाधाव केली, पाणी काढण्याचा प्रयत्न केला, मात्र दादाचा जीव गेला... एवढे सांगताना धाकट्या अबुबक्कर सिद्दीक याला अश्रू अनावर झाले. आपल्या माेठ्या भावाचा मृत्यू डाेळ्यासमाेर पाहणाऱ्या अबुबक्करला अश्रू अनावर झाले हाेते.भाट्ये येथील समुद्रात अंघोळ करताना रेहान अब्दुल्ला शेख (११, रा. क्रांतीनगर, रत्नागिरी) आणि प्रणय रघुनाथ जाधव (२४, रा. कोकणनगर, रत्नागिरी) या दाेघांचा बुडून मृत्यू झाला. यावेळी त्यांच्यासाेबत आठ वर्षांचा अबुबक्कर हाही हाेता. आपल्या माेठ्या भावाचा डाेळ्यांदेखत मृत्यू हाेताना पाहून त्याला धक्का बसला. भावाला वाचविण्यासाठी त्यानेही प्रयत्न केले.मूळ झाशी येथील शेख कुटुंब गेली २० ते २५ वर्षे रत्नागिरीतील क्रांतीनगर येथे वास्तव्यास आहेत. अब्दुल्ला शेख हातगाडीवर भाजी विक्री, तर पत्नी निलोफर पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करते. मिळणाऱ्या तुटपूंज्या कमाईवर त्यांचा घरसंसार चालतो. अब्दुल्ला व निलोफर यांना रेहान व अबुबक्कर सिद्दीक ही दोन मुले. मोठा रेहान इक्रा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पाचवीत होता, तर अबुबक्कर सिद्दीक हा कोकणनगर येथील शाळेत दुसरीत आहे. रेहानने आईबरोबर स्वत:ही रोजा ठेवला होता.गल्लीत खेळत असताना या मुलांना अचानक प्रणय भेटला. दुपारी १:३० वाजता प्रणय रेहान व अबुबक्कर सिद्दीकला सोबत घेऊन गेला. कोकणनगरवरून हे तिघे चालत गेले. मात्र, दोन तासांत रेहान बुडाल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली आणि आईला धक्का बसला. सोमवारी सकाळी रेहानचा मृतदेह क्रांतीनगर येथील घरी आणण्यात आला, त्यानंतर कोकणनगर येथील कब्रस्थानमध्ये पार्थिवावर दफनविधी करण्यात आला. मोठ्या दादाच्या अशा जाण्याने सणासुदीला, ईदच्या आनंदाला जणू गालबोट लागले आहे.सायकलला रंग काढायचा हाेतापरीक्षा संपल्याने ही मुले घरीच होती. सायकलला रंग लावण्यासाठी मुले आईकडे पैशाचा आग्रह करीत होती. मात्र, वडील घरी आल्यावर पैसे देतो, असे सांगत आईने दोघांची समजूत घातली होती.
लहान भावाच्या समोरच गेला ‘दादा’चा जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 6:56 PM