रत्नागिरी : वयाची साठ वर्षे झाली की, पुढील आयुष्य कसे जाणार याची चिंता अनेकांना पडलेली असते. पूर्वीच्या काळातील माणसं काबाडकष्ट करत असल्याने त्यांचे आयुर्मान चांगले होते असे म्हटले जाते. ते सत्यात उतरवले आहे. घोडवली (ता. संगमेश्वर) येथील आजींनी. या आजींनी १७ फेब्रुवारी रोजी वयाची १२० वर्षे पूर्ण केली. लक्ष्मी सखाराम भोजने असे या आजींचे नाव असून, त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा वाढदिवसही साजरा केला.संगमेश्वर तालुक्यातील मुचरी गावात पार्वती मोरे या आजींचे वय १०६ वर्षे आहे. या आजींच्या वयाला ओलांडत घोडवलीतील लक्ष्मी भोजने यांनी वयाची १२० वर्षे पूर्ण केली आहेत. १७ फेब्रुवारी १९०१ रोजी जन्मलेल्या लक्ष्मी भोजने यांचे माहेर संगमेश्वरातीलच चांदिवणे गवळीवाडी येथील आहे.
घोडवली येथील सखाराम भोजने यांच्याशी त्यांचा विवाह झाला. बालपणापासूनच शेतीची आवड असल्याने लक्ष्मी यांनी स्वतःला शेतीच्या विविध कामात झोकून दिले. भातशेती बरोबरच नाचणी, वरी, खामडी अशी विविध प्रकारची शेती त्यांनी अनेक वर्षे केली. त्यातून त्यांनी चांगले उत्पन्नही घेतले होते. शेतकरी कुटुंब असल्याने सतत कष्ट सुरुच असायचे. त्यामुळे ४ मुलगे आणि ३ मुली होऊनही लक्ष्मी यांची प्रकृती नेहमीच ठणठणीत राहिली.पती निधनानंतर खचून न जाता, संसाराचा सारा भार त्यांनी स्वत:वर घेतला. मुलांना शक्य झाले तेवढे शिक्षणही त्यांनी दिले. शिक्षण घेत असतांना मुलांनी शेतीत मदत करुन आईचे हात बळकट केले. किरकोळ आजाराव्यतिरिक्त कोणताही गंभीर आजार नसलेल्या लक्ष्मी भोजने यांनी सन २०१० साली वयाची १०० वर्षे पूर्ण केली. त्यावेळीही कुटुंबियांनी त्यांचा शतकोत्सव साजरा केला होता.कष्टप्रद वाटचालनोकरी, व्यवसायानिमित्त मुले शहराकडे गेली. मुला - मुलींची लग्ने झाल्यानंतर प्रत्येकाचा संसार सुरू झाला. मात्र, सारे कुटुंब लक्ष्मी यांची विचारपूस करून त्यांना आदराची वागणूक देत होते. मुलांकडून चार पैसे हातात येऊ लागले म्हणून लक्ष्मी यांनी शेती करणे सोडले नाही. अशातच त्यांच्या चार मुलांपैकी दोघांचा मृत्यू झाला. तरीही खचून न जाता लक्ष्मी यांनी आपली कष्टप्रद वाटचाल सुरुच ठेवली.स्वत:ची कामे स्वत:चवयाची शंभरी गाठूनही लक्ष्मी या केर कचरा, सडा सारवण आदी कामे करतच होत्या. गेल्या पाच सहा वर्षात वयोमानानुसार ऐकू कमी येणे, नजर कमी येणे असे प्रकार जाणवू लागले आहेत. आता माणूस जवळ आल्याशिवाय त्यांना ओळखता येत नाही. मात्र अशा परिस्थितीतही अजूनही त्या स्वतःची सर्व कामे स्वतः करत आहेत. वय इतके वाढल्यानंतरही एका जागी न बसता त्या घरात हिंडून फिरुन आहेत.