- आपत्तीतील सहकार्यातून कृतज्ञता नि संस्कृतीचे दर्शन
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : सहकारातून सामुदायिक शेती करणाऱ्या वेहेळेतील प्रगती व भाग्यश्री महिला शेतकरी गटाने चिपळुणातील पूरग्रस्त कुटुंबीयांना अन्नधान्य व अन्य साहित्याचे किट दिले. महिला शेतकरी गटाच्या या दातृत्वाचे कौतुक होत आहे.
चिपळूण तालुक्यातील वेहेळे-राजवीरवाडी येथे प्रगती व भाग्यश्री हे दोन महिला शेतकरी गट सहकारातून सामुदायिक शेती सेंद्रिय पद्धतीने करतात. गेल्या पाच वर्षांपासून येथील उत्पादित फळभाज्या या शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रालगतच्या प्रांगणात दलालमुक्त विक्री व्यवस्थेतून विकल्या जातात. शहरवासीयांनी या शेतमालाला उदंड प्रतिसाद दिला आहे. गटातील महिला शेतकऱ्यांच्या या कष्टाचे कौतुक प्रत्यक्ष शिवारफेरीच्या माध्यमातून चिपळूणवासीयांनी अनेकदा केले आहे. शहरवासीयांच्या संपूर्ण सहकार्यामुळेच दरवर्षीच्या रब्बी हंगामात या गटांनी अन्नपूर्णा शेती प्रकल्पाच्या माध्यमातून लक्षावधींची उलाढाल साधली.
जेव्हा महापुराने चिपळूणला वेढा दिला नि साऱ्यांचे अतोनात नुकसान केले. या वार्तेने या महिला शेतकरी अस्वस्थ झाल्या. ज्या शहरवासीयांनी आपल्या गटाला व्यवसायात सहकार्य केले, त्यांच्याप्रति या संकटात कृतज्ञता म्हणून काही काम करावे हा विचार पुढे आला. आपण या साऱ्या संकटात काहीतरी करायला हवे, या भावनेनं त्या कृतीशील झाल्या. पहिल्या दोन दिवसात त्यांनी शहरात पिण्याच्या पाण्याचे वितरण केले. त्यानंतर आपापल्या घरातील अन्नधान्य गोळा केले. त्यातून तांदूळ, लापशी यासह गहू, साड्या, सॅनिटरी पॅड अशा साहित्याचे पॅकेट्स करून ते गटाच्या गाडीतून पेठमाप गणेशवाडी येथील ५० कुटुंबीयांसाठी ही जीवनावश्यक साहित्य पॅकेट्स देण्यात आली.
या संवेदनशील उपक्रमातील वितरणप्रसंगी शुभांगी राजवीर, श्रुती राजवीर, अरुणा राजवीर, संध्या राजवीर, जयश्री राजवीर, गणेश घाणेकर यांच्यासह प्रगती व भाग्यश्री महिला शेतकरी गटाच्या सदस्य-पदाधिकारी उपस्थित होत्या.