चिपळूण : कोरोना महामारीत जीवावर उदार होऊन तुम्ही साऱ्यांनी काम केले. अनेक अडचणींचा सामना करत जनतेसाठी तुम्ही दिलेले योगदान हे अमूल्य असल्याचे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी करतानाच वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
तालुक्यातील अतिशय दुर्गम असणाऱ्या फुरुस आरोग्य केंद्राला बांधकाम व्यावसायिक राजू बेर्डे, फ्रेंड डेव्हलपर्सचे साजन कुरुसिंगल, दीपक सावर्डेकर, उद्योजक केतन पवार, सचिन पाकळे यांनी संगणक प्रिंटर व अन्य साहित्य दिले. त्याचे उदघाटन आमदार निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर मार्गदर्शन करताना आमदार निकम म्हणाले की, कमी कर्मचारी आणि सोयी-सुविधांचा अभाव असताना तुम्ही कार्यक्षेत्रात कोरोना रोखण्यासाठी उत्तम काम केले आहे. हे योगदान येथील जनता विसरणार नाही. अंगणवाडी सेविका, आशा सेविका अशा साऱ्यांनी जीवावर उदार होऊन काम केले आहे.
आज कोरोनाने अनेक जवळचे लोक हिरावले आहेत. त्यामुळे तिसरी लाट येणार नाही आणि दुसरी लाट लांबणार नाही, याविषयीची काळजी घेण्याचे आवाहन आमदार निकम यांनी केले. यावेळी रुग्णकल्याण समिती अध्यक्ष पूनम चव्हाण, डॉ. ज्योती यादव, फुरुस सरपंच शांताराम कदम, दुर्गवाडी सरपंच चेतना निकम, कुटरे सरपंच राजू गुजर, कोसबी सरपंच अनुराधा गुजर, डेरवण उपसरपंच देवेंद्र राजेशिर्के यांच्यासह सुधीर राजेशिर्के, प्रकाश कदम, संजय कदम उपस्थित होते.