रत्नागिरी : आपत्ती दरम्यान व नंतरच्या काळात मदत करण्यासाठी विविध संस्था, संघटना पुढे आल्या व त्यांनी तातडीची मदत तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर आदी महानगरपालिकांनी पथके पाठवली होती. आपत्तीनंतर जिल्हयातील आरोग्य यंत्रणा व बाहेरील जिल्ह्यातील अनेक डॉक्टर व आरोग्यसेवकांनी तातडीने साथरोग पसरु नये, याची काळजी घेतल्याने नंतरच्या काळात सर्व वातावरण आता सुरळीत झाले आहे. याबाबतही ॲड. परब यांनी सर्वांचे आभार मानले.
मृतांच्या वारसांना ३१ लाखांचे वाटप
खेड आणि चिपळूणमध्ये झालेल्या अतिवृष्टीतील बाधितांना निकष शिथिल करुन अधिकाधिक मदतीचे वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या आपत्तीमधील मृतांच्या वारसांना नैसर्गिक आपत्तीमधून प्रत्येकी ४ लाख रुपये आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष मदत म्हणून प्रत्येकी १ लाख रुपये देण्याचा निर्णय घेऊन लगेच वाटप सुरु करण्यात आले आहे. यात आतापर्यंत ३१ लाख रुपये वारसांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.