राजापूर : तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने चिंतित असलेल्या राजापूरकरांना गेल्या चार दिवसात मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना तपासणीत बाधित आढळणाऱ्या रूग्णांच्या संख्येत मोठी घट होत आहे. काही ठिकाणी तर सर्वांचेच तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने राजापूरकर सुखावले आहेत.
कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य आणि महसूल विभागाच्या जोडीला पोलीस प्रशासनही कामाला लागले आहे. आरोग्य विभागाच्या हातात हात घालून पोलीस अधिकारी व कर्मचारी ग्रामीण भागात नागरिकांच्या अँटिजन तपासणीत गर्क आहेत. राजापूर पोलीस स्थानकाने आपल्या अखत्यारित येणाऱ्या भागापैकी शेढे, केळवडे व हातिवले ही गावे दत्तक घेतली आहेत. याच्या जोडीला अन्य ठिकाणीही तपासणीची मोहीम सध्या मोठ्या स्वरूपात सुरू आहे.
दरम्यान, पोलीस आणि आरोग्य विभागातर्फे तिवरे आणि ओझर येथे अठराजणांच्या करण्यात आलेल्या अँटिजन चाचणीत सर्वच अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पाचल येथे केलेल्या चाचणीत सर्व ९८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. वडदहसोळमध्ये ८५ जणांच्या केलेल्या चाचणीत सर्वच अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रेल्वे स्थानक येथे ५० जणांच्या चाचणीचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. सोल्ये येथे सर्व ४७ जणांचे अँटिजन चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. याठिकाणी बारा जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली, त्याचा अहवाल येणे बाकी आहे.
राजापूर पोलीस स्थानकाने दत्तक घेतलेल्या शेढे गावात १९५ जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली. त्यापैकी तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यात गेल्या तीन दिवसात कोरोना तपासणीचे अहवाल बहुतेक निगेटिव्ह येत असल्याने आरोग्य विभागासह तालुक्यातील जनतेलाही तूर्त दिलासा मिळाला आहे.