राजापूर : तालुक्यात प्रस्तावित असलेल्या रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पामुळे शहर आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहेच; पण त्याहीपेक्षा कोरोना महामारी आणि लॉकडाऊनच्या संकटामुळे कोलमडलेल्या तालुका, जिल्हा, राज्य आणि देशांच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याची क्षमता या प्रकल्पाला आहे. त्यामुळेच आम्ही या प्रकल्पाचे समर्थन करीत तसा ठराव मंगळवारी पारित केल्याची माहिती नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांनी दिली आहे.
राजापूर तालुक्यात ज्या ठिकाणी हा प्रकल्प होईल तिथल्या जनतेच्या शंकांचे समाधान करून व स्थानिक जनतेला विश्वासात घेऊनच तो व्हावा अशी भूमिकाही ॲड. खलिफे यांनी मांडली. मंगळवारी राजापूर नगर परिषदेने रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाचा ठराव करण्यात आला. रिफायनरी प्रकल्पाला काँग्रेस पक्षाने यापूर्वीच समर्थन दर्शविले आहे. तालुक्यातील काही ग्रामपंचायतींनीही प्रकल्पाचे समर्थन करत तसे ठराव पारित केले आहेत. त्यामुळे नगर परिषदेने देखील या प्रकल्पाच्या समर्थनाची भूमिका घेत आपला पाठिंबा दर्शविला आहे. चांगल्या आरोग्य, शैक्षणिक सुविधा आणि बेरोजगारी मिटणार असेल आमच्या स्थानिक तरुणांना रोजगार मिळणार असेल तर असे प्रकल्प आलेच पाहिजेत आणि त्याचे स्वागत झाले पाहिजे, अशी भूमिका नगराध्यक्षांनी मांडली.
आज कोरोना संकटात आरोग्य सुविधेची किती आणि कशी वानवा आहे हे आपण सगळेजण पाहत आहोत. शासन आपल्या परीने करत आहे; मात्र ते पुरे पडू शकत नाही. अशा काळात रिफायनरी कंपनीनेही तालुक्यात आरोग्य सेवा पुरविण्याचा प्रयत्न केला आहे. निश्चितच ही चांगली सुरुवात आहे. भविष्यात जर या प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्यात चांगली, सक्षम आरोग्य सेवा निर्माण होणार असेल आणि त्याचा लाभ सामान्य जनतेला मिळणार असेल तर भविष्यासाठी एक चांगलेच असल्याचे ॲड. खलिफे यांनी सांगितले.
या प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्याच्या आणि शहराच्या विकासाला गती मिळावी अशी आपली भूमिका असून त्यासाठीच आम्ही या प्रकल्पाचे समर्थन करीत असल्याचे त्यांनी सांगितले. वेळप्रसंगी मतभेद, राजकीय उणीदुणी बाजूला सारून अशा विकासात्मक कामासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. स्थानिक जनतेला जर हा प्रकल्प हवा असेल, त्यांचे समाधान होणार असेल तर त्यांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प मार्गी लावला पाहिजे अशीही आमची भूमिका आहे.
कोट्यवधींची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पामध्ये कोरोनाकाळात मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्याची क्षमता आहे. त्यामुळे निश्चितच राज्य आणि देशपातळीवर हा प्रकल्प राबविण्याबाबत सकारात्मक निर्णय होईल याची आपणाला खात्री असल्याचे नगराध्यक्ष ॲड. खलिफे यांनी सांगितले़ भविष्यातील विकासासाठी हा प्रकल्प मार्गी लागला पाहिजे, अशी आपली ठाम भूमिका असल्याचे ॲड. खलिफे यांनी सांगितले.