रवींद्र कोकाटे -- सावर्डेसह्याद्रीच्या डोंगर पायथ्याशी गर्द जंगलाच्या कुशीत उभारण्यात आलेला डेरवण राजेशाही धरण प्रकल्प पंचक्रोशीतील २५हून अधिक गावांना वरदान ठरला आहे. येथील पिण्याच्या पाण्याबरोबर शेती, शेतीपूरक उद्योग, व्यवसायांना भरभराट आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील जलस्रोत वाढलेच. पण शेतीमध्ये अनेक पिके निघू लागल्याने येथे आर्थिक सुबत्ता आली. त्यामुळे सगळीकडे हिरवीगार शेती दिसू लागली.चिपळूण तालुक्यातील सावर्डे -डेरवण येथील दंड जंगलाच्या पायथ्याशी १९९९मध्ये या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची उभारणी झाली. प्रकल्प उभारणीत तत्कालीन मंत्री शशिकांत सुतार यांनी मदत केल्याने व डेरवण वालावलकर ट्रस्ट व ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रकल्पाला गती मिळाली. यामध्ये सावर्डेवासीयांचे सहकार्य मोलाचे ठरले. रत्नागिरी ग्रामविकास व जलसंधारण विभागाने लघु पाटबंधारे स्थानिक स्तर विभागाच्या अधिपत्याखाली प्रकल्प पूर्णत्त्वास नेला. धरणाची लांबी ४६० मीटर, उंची ४०.८० मीटर पाणलोट क्षेत्र ७.७९ चौरस किमी, सांडवा लांबी ५४.०० मीटर, संचय पातळी १५४ मीटर, बुडित क्षेत्र ३९.४८, तर एकूण पाणीसाठा ३.२३ दशलक्ष घनमीटर इतका आहे. यामुळे १८३ हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. ३.२३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा पूर्ण क्षमतेने दरवर्षी भरला जातो.या प्रकल्पामुळे पंचक्रोशीतील सावर्डे-डेरवण, हलकर्णी, काजारकोंड, उदेगवाडी, कासारवाडी, आगवे, मांडकी खुर्द, निवळी, भुवडवाडी, तुरंबव, दहीवली, आबिटगाव आदी वस्त्यांमधील ६०हून अधिक ग्रामपंचायती व अन्य विहिरींचे जलस्रोत वाढून पाण्याची पातळी वाढल्याचे दिसत आहे. दरम्यान, या धरणातून वाहणारे पाणी कापशी नदीपात्रातून वाहात जाते. या नदीपात्रात विहिरी, ओढे, डुऱ्यांना पाणी पातळी वाढ झाली आहे. धरणामधील पाणीसाठा संपला तरी नदी पात्राशेजारच्या विहिरींना किमान एक महिनाहून अधिक काळ पाणी उपलब्ध असते.प्रकल्प होण्याअगोदर परिसरातील गावांना कवे, विहीर यावर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच पाणीटंचाइचे दुर्भिक्ष्य ओढवत असे. पाण्यासाठी महिलांना विहिरीवरून मैलोनमैल पाणी डोक्यावरुन आणावे लागत होते. परंतु या धरणामुळे सावर्डे परिसरातील गावांना पाण्याच्या योजना झाल्या आणि लोकांच्या घरोघरी पाण्याचे नळ गेले.या नदीपात्रातील पाण्याचा उपयोग भाजीपाला, फूलशेती, विविध फलोत्पादन आंबा, काजू, नारळ, आंबा, केळी, कलिंगड आदी पिके घेण्यासाठी होत आहे. या पिकांकडे शेतकरी काहीअंशी वळला असून, तो उत्पादनातून आर्थिक स्तर उंचावताना दिसत आहे. कोकणचा कायापालट करायचा असेल तर डोंगर-दऱ्यातून वाहणारे पाणी अडवणे, अडवलेले पाणी जमिनीत मुरवणे व दीर्घकालीन जलसाठे निर्मिती करणे ही जबाबदारी आहेच, पण अशा डोंगरदऱ्यांमध्येही मध्यम स्वरुपाचे पाझर तलाव अत्यंत गरजेचे आहे. राज्य शासनाला जलसंधारण धोरणात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. परंतु हे या सरकारमध्ये दिसत नाही, असे मत शेखर निकम यांनी व्यक्त केले.
डेरवण धरणाने आणली हरितक्रांती
By admin | Published: April 24, 2016 10:08 PM