रत्नागिरी : रत्नागिरीच्या राजकारणातील व समाजजीवनातील जनमान्य नेतृत्व व आदर्श नेते पहिले थेट नगराध्यक्ष डॉ. जगन्नाथ शंकर केळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून माजी आमदार बाळ माने यांनी त्यांना आदरांजली वाहिली.
यावेळी माजी आमदार बाळ माने यांनी जुन्या आठवणी जागवल्या. जेव्हा जेव्हा रत्नागिरीचे आणि रत्नागिरीमध्ये झालेल्या विकासाचे नाव काढले जाते तेव्हा डॉक्टर केळकर यांचे नाव जनतेच्या तोंडी येते व हे नाव कायम जनतेच्या तोंडी येत राहील, असे बाळ माने म्हणाले. जनसंघाच्या माध्यमातून जी कामे रत्नागिरीत झाली त्यामागील परिश्रम आणि त्या कामांचे साक्षीदार डॉ. केळकर आणि दिवंगत नेते यशवंतराव माने हे आहेत, हे यानिमित्ताने लक्षात येते, असेही यावेळी बाळ माने म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण असेल, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा असेल, बा. ना. सावंत रोडजवळची भाजी मंडई असेल, त्यामागील २ नंबरची शाळा या सर्वांमागील त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्याच कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, व्यायामशाळा, नवीन भाजी मार्केट, शाळा क्रमांक दोनची इमारत, वेदपाठशाळा आदी अनेक कामे यशस्वीरित्या पूर्ण झाली, असे बाळ माने यांनी सांगितले.