गुहागर : हॉटेलचे आॅनलाईन बुकिंग करुन गुहागर येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटक कुटुंबाला यात्रा सेवा देणाऱ्या कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका बसला. महिनाभरापूर्वी आरक्षण करुनही हॉटेल उपलब्ध न झाल्याने या कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागला.याप्रकरणी प्रभाकर वामन भोगले यांनी गुहागर पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी ग्राहक न्यायालयात जाण्याचा निर्णय संबंधितांनी घेतला आहे. यात्रा, सहलीचे आॅनलाईन बुकिंग व सेवा देणाऱ्या यात्रा.कॉम या वेबसाईटवर मुंबई येथील भोगले कुटुंबियांनी एक महिन्यापूर्वी हॉटेल आरक्षित केले. डबलबेडसाठी ३,१५६ रुपये व फोर बेड रुमसाठी ५,३७९ रुपये इतकी हॉटेल बुकिंगची रक्कम त्यांच्या आयसीआय या बँकेच्या क्रेडीट खात्यामधून वर्ग झाली. त्यानुसार भोगले कुटुंबियांना क्रमांक अळ0001734699 आणि अळ0001734635 या क्रमांकाच्या दि. २६, २७ व २८ डिसेंबरच्या हॉटेल कन्फर्मेशन रिसीटस् मिळाल्या. शुक्रवार, दि. २६ रोजी दुपारी भोगले कुटुंबीय दुर्गा पर्ल येथे पोहोचले. मात्र, त्यांच्या नावे हॉटेलमध्ये रुम आरक्षित नसल्याचे हॉटेल व्यवस्थापनाने सांगितल्याने प्रवासात शिणलेल्या भोगले कुटुंबियांच्या सहलीच्या आनंदावर विरजण पडले. हॉटेलमालक रवी खरे यांनी त्यांची अन्य हॉटेलमध्ये व्यवस्था करण्याची तयारी दाखविली. पण, आरक्षण करुनही झालेल्या त्रासामुळे सदर पर्यटकांनी गुहागर पोलिसात तक्रार दिली. (वार्ताहर)
आॅनलाईन यात्रा सेवेतील गलथानपणा
By admin | Published: December 26, 2014 11:39 PM