रत्नागिरी : मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरणाच्या गळतीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन व संसदीय कार्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याशी संपर्क साधला व याबद्दल माहिती घेतली.
परब हे गेले दोन दिवस सातत्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. धरण परिसरातील ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी परब यांनी दिल्या. धरणाचा बंधारा खचलेल्या भागाच्या मजबुतीकरणाचे काम युध्दपातळीवर करावे सोबतच धरण परिसरातील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करावे, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी केल्या. यासाठी शासनस्तरावर कोणत्याही मदतीची आवश्यकता असल्यास सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
धरण दुरुस्तीबाबत संबंधित सर्व अधिकाऱ्यांना सूचना देऊन घटनास्थळी जात याबाबतचा आढावा घेण्याच्या सूचना परब यांनी दिल्या. धरण दुरुस्तीच्या उपाययोजना तत्काळ सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी या घटनेमुळे घाबरुन न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी केले.
धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून, ३० टक्के पाणी सोडण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. धरणाचा सांडवा दोन मीटरपर्यंत सोडलेला आहे. अजूनही काही प्रमाणात पाणी धरणातून सोडण्यात येणार आहे. दरम्यान, मंगळवारच्या परिस्थितीनुसार स्थलांतरित केलेल्या ग्रामस्थांना धोका पूर्ण टळल्यानंतर त्यांच्या घरी परत पाठविण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी मिश्रा यांनी पालकमंत्र्यांना सांगितले.