दापोली : लग्नाच्या मानपानात कपडे, दागिने व अन्य भेटवस्तू देण्याच्या प्रथेला फाटा देत येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील वनशास्त्राचा संशोधक अमित मिरगळ व त्याची पत्नी दीप्ती पालेकर यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांना वृक्षरूपी आहेर देऊन एक आगळा - वेगळा संदेश दिला. हा विवाह दापोली शहरातील श्री मंगल कार्यालय येथे पार पडला.मूळ संगमेश्वर तालुक्यातील असणारा अमित हा येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात वनशास्त्र विभागात संशोधक म्हणून कार्यरत आहे. त्याचे वडील सांगली येथील कॉटन मिलचे निवृत्त कर्मचारी आहेत. त्यांचा सांगलीत वेल्डींग वर्कशाप व चारचाकी गाड्यांना रंग मारण्याचा व्यवसाय आहे.अमित दापोलीत गेली ८ वर्ष राहात आहे. तो कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात वनस्पतीशास्त्र या विषयात पीएचडीचा अभ्यास देखील करत आहे. आपण वेगळ्या पध्दतीने येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करावे असे त्याच्या मनात अनेक दिवस घर करून होते. मग आपण ज्या विभागात काम करतो तेच आलेल्या पाहुण्यांना का देऊ नये, असा विचार त्याच्या मनात आला. त्याने हा विचार आपल्या घरातील ज्येष्ठांना बोलून दाखवला. सर्वांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देखील दिला. मग त्याने विद्यापीठ व परिसरातून अर्जुन, अश्वगंधा, बेल, कडूलिंंब, सूरमाड, गुंज, मधुपर्णी, नागकेशर, सीताअशोक, सप्तरंगी, टेटू, आपटा, बहावा, बकूळ, सुरंगी, रेनट्री, नीलमोहर, आवळा, कोकम, कडीपत्ता, चिंंच, रिठा, तिसळ, उंडी, चहापात, वाळा व उंबर, आदी विविध प्रकारची सुमारे ५०० औषधी झाडे आणली. तसेच लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांचे कपडे खराब होऊ नयेत याकरिता प्रत्येक झाडाला अतिरिक्त प्लास्टिकची पिशवी देखील लावली. यामुळे सर्व पाहुण्यांनी अगदी हसत हसत हा मान स्वीकारला.आपण लग्नात अनावश्यक खर्च करतो, तो टाळला जावा व लग्नाच्या निमित्ताने काही झाडांची नव्याने लागवड व्हावी या हेतूने त्यांनी हा अभिनव उपक्रम राबविला. या झाडांपासून पाहुण्यांना व जनतेला ‘आॅक्सिजन’ मिळावा हीच प्रेरणा यामागे असल्याचे अमित याने सांगितले. त्याच्या या अभिनव कल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे. (प्रतिनिधी)
पाहुण्यांना वृक्षरूपी आहेर
By admin | Published: March 27, 2016 10:07 PM