संकेत गोयथळे--गुहागर -निसर्गाची देणगी लाभलेला गुहागर तालुका हा सर्वच क्षेत्रात शांत तालुका म्हणून ओळखला जातो. यामुळे जिल्ह्यात कमी गुन्ह्यांची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात होते. नवीन वर्षात मात्र ५०हून अधिक गुन्हे दाखल झाले असून, एप्रिल महिन्यात सर्वाधिक २१ गुन्ह्यांची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात झाली आहे.गुहागरची खरी ओळख आता पर्यटन तालुका म्हणून होऊ लागली आहे.. एन्रॉनमुळे गुहागरचे नाव जगाच्या नकाशावर आले आहे. यानंतर औद्योगिक क्षेत्रात तेवढी प्रगती झालेली नसली तरी सध्याच्या रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पामध्ये काही प्रमाणात परप्रांतीय कामगार कार्यरत आहेत. पर्यटन वाढीमुळे येथील जमिनीचे भाव वाढल्याने मुंबई व इतर भागात राहणारा गुहागरकर आता घराकडे परतू लागला आहे.बाहेरील पर्यटकांची ये - जा व येथे खरेदी केली घरे वर्षभर बंद अवस्थेत असतात. जमिनीची विक्री यामधून स्थानिकांना अचानकपणे वारेमाप पैसा मिळू लागला. यामधून वाढणारी फसवणूक व वाद यामध्येही वाढ होताना दिसत आहे. वाहनांची वर्दळ वाढल्यामुळे अपघातही होत आहे. वर्षाकाठी काहीजण प्राण गमावतात. यामध्ये बाहेरील वाहनांचा बऱ्याचवेळा सहभाग असतो. या साऱ्याचा एकत्रित परिणाम म्हणून गुहागर पोलीस ठाण्यात गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे.गेल्या काही वर्षांची गुहागर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांची आकडेवारी वर्षाला १०० च्या सरासरीने किंवा त्याहून कमी आहे. २० एप्रिल १५ अखेर १०४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. २०१६मध्ये मात्र हा रेकॉर्ड ब्रेक होईल, असे दिसत आहे. जानेवारीमध्ये ९, फेब्रुवारीत ७ यानंतर मार्चमध्ये १५ व एप्रिलमध्ये तर सर्वाधिक २१ गुन्ह्यांची नोंद होऊन गेल्या चार महिन्यातच ५१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.एप्रिलमध्ये दोन घरफोड्या झाल्या असून, खोडदे गावात एका घरात घरफोडीचा प्रयत्न झाला तर मढाळ येथे निवृत्त पोलीस हवालदाराच्या घरीच घरफोडी करण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेली. तीन चोऱ्यांमध्ये पडवे येथे ४ हजारांची आंबे चोरी व वेळणेश्वर येथील एका घरातून नोकरानेच चोरी केल्याचे उघड झाले. पिंपर मंदिरमधील दानपेटीतील तब्बल ४० हजार रुपये चोरले. या चोराला दानपेटी व पैशासह ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.गर्दी, मारामारीचेही दोन गुन्हे दाखल होऊन पिंपर येथील मंदिरातील दानपेटी चोरल्याप्रकरणी चोरट्याला अज्ञातानी बेदम मारहाण केल्याची नोंद करण्यात आली. ही मारहाण एवढी गंभीर होती की, मारहाण झालेल्या चोरट्याला रत्नागिरी येथील एका रूग्णालयात तब्बल २० दिवस अतिदक्षता विभागात दाखल करण्याची वेळ आली. नवानगर येथे गैरसमजातून दोन गटात मारामारी झाली. दुखापतीचे सर्वाधिक ५ गुन्हे दाखल असून, पिंपर येथील दोन, काजुर्ली येथे ज्येष्ठ नागरिकांमध्ये गैरसमजातून मारहाण, नवानगर येथे एकाला दगड मारुन जखमी केल्याप्रकरणी, आंबेरे येथील काका- पुतण्यात हाणामारी झाली. या वादातून सजा भोगून आल्यानंतर काकाने रॉकेल ओतून पेटवून घेतले. यामध्ये गंभीर भाजून ते मृत झाले.घराविषयी आगळीकीतून एक गुन्हा दाखल झाला. मासू येथील काशिनाथ भोजने व पत्नी यांना घरी जाऊन दमदाटी करण्यात आली. बेपत्ताच्या तीन नोंदी झाल्या. यामध्ये कोतळूक येथील अल्पवयीन मुलीला बेळगाव येथील रस्ता कामगाराने पळवून नेले. कीर्तनवाडी येथील अल्पवयीन मुलीला एका मुलाने पळवून नेल्यानंतर काही तासातच पोलिसांनी मुलीचा शोध घेतला. १७ वर्षाचा बेपत्ता झालेला मुलगा काही दिवसांनी परत आला. या विविध घटनांमुळे पाच महिन्यात गुहागरातील गुन्ह्यांची संख्या वाढली आहे.
गुहागर तालुक्याला गुन्हेगारीचा विळखा
By admin | Published: May 22, 2016 9:14 PM