गुहागर : भावगीते, भक्तीगीते आणि नाट्यसंगीत अशी एकापेक्षा एक दर्जेदार गाणी सादर करून श्रीदेव व्याडेश्वराचा उत्सव अधिकच खुलवला. सादर केलेल्या संगीत रजनीने उपस्थितीत रसिकांसह रात्र जागवली.गुहागर शहरातील श्रीदेव व्याडेश्वर देवस्थानचा सलग सहा दिवस सुरू असलेल्या उत्सवामध्ये पुणे येथील रंगावली प्रस्तुत मराठी भावगीत, भक्तीगीत व नाट्यगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गायक अरविंद फाटक, अर्चना सहस्त्रबुद्धे आणि कीर्ती वैद्य यांनी एकापेक्षा एक दर्जेदार गाणी सादर करून रसिकांना खिळवून ठेवले होते.या कार्यक्रमाची सुरुवात शिव भोळा... या गाण्याने करण्यात आली. त्यानंतर सुंदरते ध्यान... या भक्तीगीतांबरोबर ‘नीज रूप दाखवा हो..., पर्ण पाचू सावळा, सावळा विठ्ठल माझा मळा, मी वारकरी आगळा’, काळ देहासी आला धावून..., कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू..., विठ्ठल नामाचा रे टाहो..., कीर्ती वैद्यने सादर केलेल्या नरवर कृष्णा समान... या नाट्यगीतांनी टाळ्या मिळवल्या. संगीत स्वयंवर या संगीत नाटकातील सुधा दही दुधी विलोका... या गाण्यानेही वाहवा मिळवली. रूसली राधा, रूसला माधव, अभिषेकीबुवांचे माझे जीवन गाणे..., या जन्मावर या जगण्यावर..., देवाघरचे ज्ञात कुणाला..., तसेच कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील ‘सूर निरागस हो’ हे गाणेही दाद मिळवून गेले. काटा रूते कुणाला, मम आत्मा गमना... ही नाट्यगीतेही तितक्याच ताकदीने सादर करण्यात आली. शेवटी कानडा राजा पंढरीचा... या भक्तीगीताबरोबर माझी सावरे रंगाची या भैरवीने सांगता करण्यात आली. या सर्व गाण्यांना आदित्य आपटे यांनी तबला साथ दिली. देवस्थानचे अध्यक्ष अरूण परचुरे व विश्वस्त मंडळाने संगीत रजनी सादर करणाऱ्या कलाकारांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या मैफलीला गुहागरातील रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पोलीस परेड मैदानावर गुहागर तालुक्यातील ‘नमनोत्सव’ कार्यक्रम सादर करण्यात आला. (प्रतिनिधी)
संगीत रजनी कार्यक्रमाने गुहागरवासीय मंत्रमुग्ध
By admin | Published: March 16, 2016 8:25 AM