गुहागर : गेली अनेक वर्षे राजकारणात सक्रिय असलेले व विविध पदे भुषवलेले गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांची विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी निवड झाल्याने आणखी एक मानाचे पद मिळाले आहे. तालिका अध्यक्ष म्हणून काम करतानाच पहिल्याच दिवशी त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली.
शिवसेना पक्षातून चिपळूण मतदारसंघांमधून दाेन वेळा आमदार पद भुषवले आहे. विधानसभेचे उत्कृष्ट संसदपटू म्हणूनही यापूर्वी त्यांचा सन्मान झाला आहे. भास्कर जाधव यांच्यामधील अभ्यासू व्यक्तिमत्त्व व आक्रमकता ओळखून राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पक्षामध्ये घेऊन पहिल्यांदा विधान परिषद आमदार म्हणून गुहागर मतदार संघाची जबाबदारी दिली. त्यानंतर गेली वर्षानुवर्षे भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुहागर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत शिवसेनेच्या तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम व भाजपचे विनय नातू यांचा पराभव करत निवडून आले. यावेळी नगर विकास राज्यमंत्री व केंद्रीय मंत्री म्हणून यशस्वी जबाबदारी सांभाळली. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पदही भुषविले.
विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले. यावेळी पुन्हा एकदा मंत्रिपदी निवड होईल, असा अंदाज बांधला जात हाेता; मात्र मंत्रीपद न मिळाल्याने भास्कर जाधव यांच्याकडून नाराजी व्यक्त हाेत हाेती. ही नाराजी दूर करण्यासाठी त्यांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर आता भास्कर जाधव यांना विधानसभेचे सन्मानाचे तालिका अध्यक्ष पद देऊन एक प्रकारे शिवसेनेकडून जाधव यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.