असगोली : गुहागर पंचायत समितीच्या उपसभापतिपदी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीचे वेळणेश्वर पंचायत समिती गणाचे सदस्य सीताराम ठोंबरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
आमदार भास्कर जाधव यांनी पंचायत समितीमधील सर्वच सदस्यांना सभापती व उपसभापतिपदी काम करण्याची संधी दिली आहे.
ठोंबरे हे तालुक्यातील शीर गावचे रहिवासी आहेत. सामाजिक कार्यातून राजकारणात सक्रिय झाले आहेत. ते वेळणेश्वर पंचायत समिती गणाचे सदस्य असून आमदार भास्कर जाधव यांचे कट्टर समर्थक आहेत. आमदार जाधव यांनी सीताराम ठोंबरे यांना उपसभापती पदावर काम करण्याची संधी दिल्याने शीर गावात एकाच जल्लोष करण्यात आला.
यावेळी सभापती पूर्वी निमुणकर, माजी उपसभापती सुनील पवार, विनायक मुळे, पंचायत समिती सदस्य पूनम पाष्टे, रवींद्र आंबेकर, माजी सभापती विभावरी मुळे, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण ओक उपस्थित होते.