असगाेली : माजी आमदार कै. डॉ. तात्यासाहेब नातू यांंच्या स्मृतिदिनानिमित्त गुहागर तालुका भाजपतर्फे चिपळुणातील पूरग्रस्तांसाठी अन्नसेवा करण्यात येत आहे. या उपक्रमाला तालुक्यातील नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून, रविवारी काही साहित्य चिपळूणसाठी पाठविण्यात आले.
चिपळूण परिसरातील भयावह पूरपरिस्थिती लक्षात घेऊन गुहागर तालुका भारतीय जनता पक्षातर्फे तालुक्यातून विविध भागातून आवश्यक मदत तातडीने पोहोच करण्यात आली. पाणी ओसरल्यानंतर शहर व परिसरातील खरी परिस्थिती समोर आली. ही परिस्थिती पाहता पूरग्रस्त परिसरात जेवणाचे साहित्य दिले तरीही जेवण तयार करणे अशक्यप्राय आहे. हे लक्षात घेत जनतेला भाजपतर्फे ‘साद भाजपची-प्रतिसाद गुहागरवासीयांचा’ अशी साद घालत डॉ. तात्यासाहेब नातू यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत पुढील आठवडाभर तयार जेवण पुरविण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी दिली.
भाजपच्या या उपक्रमाला गुहागर तालुका व तालुक्याबाहेरील जनतेनेही उदंड प्रतिसाद दिला आहे. या मोहिमेच्या नियोजनानुसार दि. २५ राेजी ४५० फुड पॅकेट्सचे वाटप चिपळूण पेठमाप येथे आणि ५ हजार लीटर पाण्याचे चिपळूण शहरात वाटप करण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, नगरसेवक निशिकांत भोजने, जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष संतोष मालप, तालुका सरचिटणीस सचिन ओक, ऋषिकेश गोखले, दिनेश बागकर, जिल्हा सोशल मीडिया संयोजक शार्दुल भावे, विनायक सुर्वे, अमोल गोखले, समीर गावणंग, किरण गडदे, महेश भाटकर, संतोष सुर्वे, संदेश ठाकूर उपस्थित होते.