गुहागर : गुहागर व खेडमध्ये तब्बल २०हून अधिक दुकानफोडी केलेले चार अज्ञात चोरटे हे बाहेरील जिल्ह्यातील नसून, जिल्ह्यातीलच सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे येत आहे. तसेच सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांची रेखाचित्रे तयार करण्यात आली आहेत, तर एकाच्या छायाचित्राची प्रिंट काढण्यात आली आहे.गुहागर शहरात शुक्रवारी रात्री सात दुकाने फोडून २८ हजार रुपयांची रोकड लांबवली. गुहागरमध्ये अशा प्रकारची पहिलीच घटना असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेच्या तपासाला सुरुवात होत असताना शनिवारी रात्री खेड येथील १२ दुकाने फोडण्यात आली.गुहागरमधून चोरीला गेलेली दुचाकी खेडमध्ये मिळाली. श्वानथकाला तपासकामात अपयश आले. ठसेतज्ज्ञांनी काही ठसे मिळविले. मात्र, तपासाला निश्चित दिशा मिळत नव्हती. सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपलेले चित्रीकरण हे अंधाऱ्या खोलीतील असल्याने यामध्ये स्पष्टता नव्हती. तरीही मिळालेले अंगठ्यांचे ठसे व सीसीटीव्हीवरील चित्रीकरण यावर एका चोरट्याचे रेखाचित्र बनविण्यात आले आहे, तर एकाच्या छायाचित्राची प्रिंटही काढण्यात आली आहे. याआधारे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांची चाचपणी करण्यात आली. तपासानुसार जिल्ह्यातील चोरट्यांवर तपासाची सुई थांबत आहे.हे संशयित फरार झाले आहेत. या प्रकरणातील चोरट्यांची संख्या चार असून, ते दापोली, खेडमधील असल्याची शक्यता आहे. पोलीस तपासाला निश्चित दिशा मिळू लागल्याने लवकरच चोरटे जेरबंद होतील, असे पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
गुहागर, खेडच्या चोऱ्या स्थानिक चोरट्यांकडून
By admin | Published: July 17, 2014 11:57 PM