अडरे : चिपळूण तालुका कृषी विभागातर्फे कृषी संजीवनी मोहीम राबवण्यात येणार आहे. खरीप हंगाम २०२१ यशस्वी करण्यासाठी व आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी चिपळूण तालुक्यातील कृषी अधिकारी व कर्मचारी हे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणार आहेत.
कृषी तंत्रज्ञानामधील छोटीशी सुधारणा शेतकऱ्याने केल्यास पीक उत्पादन वाढीवर मोठा परिणाम दिसत आहे.
या कालावधीत शेतकऱ्यांना भात लागवड पद्धत, बीज प्रक्रिया, जमीन आरोग्यपत्रिकेनुसार खताचा संतुलित वापर, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार, महत्त्वाच्या पिकांची कीड व रोग नियंत्रणाची उपाययोजना व कृषी विभागाच्या योजना आदी बाबींवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे
चिपळूण तालुक्यातील दादर येथे या मोहिमेअंतर्गत भातपीक शेतीशाळा व सभा घेण्यात आली. या सभेमध्ये एस. आर.टी.,चारसूत्री भात लागवड पद्धत, रोपवाटिका व्यवस्थापन, जमीन सुपिकता निर्देशांकानुसार खत व्यवस्थापन व १० टक्के रासायनिक खताची बचत करण्यासाठी शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत, हिरवळीच्या खत, जिवाणू संवर्धक, पिकाच्या अवेशषाचा वापर, गिरीपुष्पाचे भातशेतीतील महत्त्व व कृषी विभागाच्या योजनेची माहिती देऊन मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी राहुल आडके, मंडल कृषी अधिकारी अशोक शेंडगे, कृषी पर्यवेक्षक मनोज गांधी, तसेच यावेळी गावातील शेतकरी, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन कृषी सहायक सचिन पवार यांनी केले हाेते.
---------------------------------------
शेताच्या बांधावर जाऊन उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले़ यावेळी तालुका कृषी अधिकारी राहुल आडके, खेर्डी मंडल अधिकारी अशोक शेंडगे, कृषी पर्यवेक्षक मनोज गांधी उपस्थित होते.