लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी : दापोली तालुक्यातील मुरुड येथे समुद्रकिनारी केतकीच्या बनात सापडलेल्या चरसची पाकिटेही गुजरात येथे सापडलेल्या पाकिटांशी मिळतीजुळती असल्याची माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. याबाबत गुजरात पोलिसांशी संपर्क साधण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
रत्नागिरी पोलिस मैदानावर आयोजित ध्वजारोहण सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी विनीत चौधरी उपस्थित होते. दापोली तालुक्यातील मुरुड येथे समुद्रकिनारी केतकीच्या बनात १२ किलो अफगाणी चरस सापडला. त्यावर कुलकर्णी म्हणाले की, प्राथमिक माहितीनुसार, ते समुद्रातून वाहत आल्याचा अंदाज आहे, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास करण्यात येत आहे. फॉरेन्सिक लॅब, श्वान पथक, दहशतवादी विरोधी पथकाचे पोलिस त्या ठिकाणी गेले होते.
थोड्याशा हव्यासापोटी, कुठल्या तरी मोहापोटी आपण बळी पडतो. जगात कोणती गोष्ट फुकट मिळत नाही. घरबसल्या कोणी नोकरी देत नाही. त्यामुळे अशा आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.
सतर्कतेच्या सूचना
मुरुड, कर्दे किनारी सापडलेली पाकिटे गुजरातमध्ये सापडलेल्या पाकिटांशी मिळतीजुळती आहेत. या संदर्भात गुजरात येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला आहे, तसेच संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील पोलिस ठाण्यांनाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.