लांजा : गुरे चारण्यासाठी जंगलात गेलेल्या गुराख्याला शॉक लागल्याने तो जागीच ठार झाला. ही घटना पालू येथे घडली असून, परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. पालू येथील सुमित जयराम अवसरे (२३) याने शनिवारी सायंकाळी आपली जनावरे चारण्यासाठी सोडली होती. जनावरांबरोबर सुमित हादेखील होता. जंगलातील एका मातीच्या ढिगाऱ्यावर चढला असता वरुन जाणाऱ्या विद्युतभारीत लाईनला त्याचा हात लागल्याने शॉक बसला. याते तो जागीच मृत झाला. सुमित चरण्यासाठी घेऊन गेलेली जनावरे घरी परतली. पण, सुमित घरी न आल्याने घरच्या मंडळींनी त्याचा शोध घेतला. मात्र, शोध घेण्यासाठी रात्र झाल्याने त्याचा शोध घेणे अशक्य झाले. दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी ३.३० वाजता त्या जंगलात तो मृत स्थितीत आढळून आल्याची माहिती पालूचे पोलीसपाटील जयसिंग गणपत घाडे यांनी लांजा पोलिसांना दिली आहे. त्यानुसार हेड कॉन्स्टेबल संतोष कोळेकर, संजय उकार्डे हे त्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय? याचा अधिक तपास करीत आहेत. अवसरेच्या मृत्यूने गावात चर्चेला उधाण आले आहे. (प्रतिनिधी)
विजेचा धक्का लागून पालू येथे गुराखी ठार
By admin | Published: December 23, 2014 12:51 AM