रत्नागिरी : समाजाला संस्कारातून सन्मार्ग दाखविण्याचे काम गुरूमाऊलींनी केल्याची भावना गाेव्याचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमाेद सावंत यांनी व्यक्त केली. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या गाेवा उपपीठ आश्रमाला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांची भेट घेऊन शुभाशिर्वाद घेतले. या भेटीदरम्यान त्यांनी संस्थानच्या कामाचे काैतुक केले.
प्रारंभी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे उत्तराधिकारी प. पू. कानिफनाथ महाराज यांनी मुख्यमंत्र्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी उभयतांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. मुख्यमंत्री सावंत यांनी संस्थानच्या उपक्रमांचे कौतुक केले. विशेष करून गेल्या महिन्यातील पूरपरिस्थितीने उद्भवलेल्या संकटकाळात संस्थानने गोव्यासह, चिपळूण, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत स्वच्छता मोहीम राबवली, अन्नदान केले, जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात वाटप केले. त्याचा गौरव मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
यावेळी मुख्यमंत्री सावंत यांना संस्थानची रुग्णवाहिका सेवा, वेदपाठशाळा, इंग्रजी माध्यमाची शाळा, रक्तदान शिबिरे, दुष्काळ व पूरग्रस्तांना मदत, मोटार ड्रायव्हिंग स्कूल तसेच संस्थानच्या गोव्यातील सामाजिक उपक्रमांची माहितीही यावेळी देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी या कार्याचे कौतुक केले.