रत्नागिरी : मुसळाधर पावसाची तमा न बाळगता सुंदरगडावर अमाप उत्साहात शनिवारी गुरूपूजन झाले. पायथ्यापासून सर्व गडावर मिळेल, त्या जागेत पूजेची संधी मिळाल्याने भाविकांचा आनंद द्विगुणीत झाला. त्यानंतर रात्री झालेल्या जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रवचनानंतर या उत्सवाची सांगता झाली. गुरुपौर्णिमेला सकाळपासूनच भाविक गुरूपूजनासाठी आसनस्थ झाले होते. आज सकाळी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे सुंदरगडावर भाविकांच्या जयघोषात आगमन झाले. प्रथम त्यांनी संतशिरोमणी गजानन महाराज, आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य, सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज यांच्या मूर्तींचे दर्शन घेऊन विधीवत पूजन केले. सोबत त्यांच्या पत्नी सकल सौभाग्य संपन्न सुप्रिया, त्यांचे सुपुत्र जगद्गुरू रामानंदाचार्यांच्या दक्षिणपीठाचे उत्तराधिकारी कानीफनाथ महाराज, त्यांच्या पत्नी ओमेश्वरी होत्या. नंतर सर्वजण संतपीठावर स्थानापन्न झाले. संतपीठावर सर्व भक्तांतर्फे गुरूपूजनाचा मान यावेळी इचलकरंजी येथील कुमार चव्हाण व मंगल चव्हाण या दांपत्याला मिळाला. ब्रह्मवृंदांचा मंत्रोच्चार, प्रज्वलीत झालेली निरंजने, सर्व भाविकांनी एकाचवेळी केलेल्या घंटानादाचा घुमलेला ध्वनी, उदबत्या, फुले व उदाचा दरवळलेला सुगंध याने वातावरण भक्तीमय झाले होते. गुरूपूजनाचा सोहळा संपल्यानंतर जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांनी आपल्या लाडक्या भक्तांना आशीर्वाद दिले. गुरूपूजनानिमित्त जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी चरणदर्शन सोहळा सुरू झाला. सोहळ्यानिमित्त रात्री रामानंदाचार्यांच्या दक्षिणपीठाचे उत्तराधिकारी कानिफनाथ महाराज यांचे प्रवचन झाले. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे साऱ्या भाविकांनी निरंजने प्रज्वलीत करून औक्षण केले. पूजन, आरतीनंतर त्यांचे प्रवचन झाले. (प्रतिनिधी)