रत्नागिरी : शहराजवळील मिरजोळे एमआयडीसी येथे एका अपार्टमेंटवर पोलिसांनी छापा टाकून सुमारे १५ हजार रुपये किंमतीचा अर्धा किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी जयदिप प्रभुदेसाई (भक्तीकुंज अपार्टमेंट, एमआयडीसी, रत्नागिरी) याला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.मिरजोळे एमआयडीसी येथे जयदीप प्रभुदेसाई याच्याकडे मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा असल्याची माहिती शहर पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते. शहर पोलिसांच्या पथकाने एमआयडीसीमध्ये सापळा रचून जयदीपला ताब्यात घेतले. त्याच्या घरात पोलिसांना अर्धा किलो गांजा सापडला.
गांजा आहे का, हे तपासण्यासाठी पोलिसांनी श्वानपथकालाही पाचारण केले. श्वानपथकाआधारे पोलिसांनी ती अपार्टमेंट आणि आजूबाजूचा परिसर पिंजून काढला. मात्र आणखी गांजा सापडला नाही. अचानक झालेल्या पोलीस कारवाईमुळे संबंधित अपार्टमेंटमधील रहिवाशांमध्ये खळबळ उडाली होती.ही धडक पोलीस कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले, सहाय्यक उपनिरीक्षक संजय साळवी, हेडकॉन्स्टेबल उदय चांदणे, दीपक जाधव, पोलीस नाईक प्रवीण खांबे, राहुल घोरपडे, दिपक बावधणे, गणेश सावंत, विलास जाधव व अन्य पोलीस होते.