रत्नागिरी : सन २०१५ची संचमान्यता झाल्याशिवाय आंतरजिल्हा बदलीला नाहरकत दाखला देऊ नये, असा निर्णय जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत घेण्यात आल्याची माहिती शिक्षण सभापती विलास चाळके यांनी दिली. सभापती चाळके यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. आंतर जिल्हा बदलीसाठी सध्या परजिल्ह्यातील शिक्षकांची धावपळ सुरु आहे. जिल्ह्यातील २५५ शिक्षक बदली करुन स्वत:च्या जिल्ह्यात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामध्ये ४१ शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने सोडण्यात येणार आहे, तर २१४ शिक्षकांना या बदलीसाठी नाहरकत दाखल्याची आवश्यकता आहे. त्यासाठी हे शिक्षक दररोज परिषद भवनात फेऱ्या मारीत आहेत. अनेकजण शिक्षण विभागाच्या बाहेर गर्दी करून बसलेले असतात. या शिक्षकांच्या बदल्यांबाबत बुधवारी झालेल्या शिक्षण समितीच्या सभेत चर्चा झाली. या आंतरजिल्हा बदलीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाचा विषयही चर्चेत आला. त्यामुळे सन २०१५ सालची संचमान्यता झाल्याशिवाय या शिक्षकांना नाहरकत दाखला देऊ नये, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे सभापत्ी चाळके यांनी सांगितले. त्यामुळे आंतरजिल्हा बदल्या रखडणार हे निश्चित आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये अनेक शिक्षक कामगिरीवर काढण्यात आले आहेत. त्यामध्ये काही शिक्षकांना सोयीची शाळा देण्यात आली आहे. या बदल्या करताना गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शासनाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे या सर्व बदल्या बेकायदेशीर आहेत. कामगिरीवर काढलेल्या शिक्षकांची कामगिरी रद्द करावी, असा आदेश सभापतींनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना या सभेत दिला. कामगिरी रद्द न करणाऱ्या गटशिक्षणाधिकाऱ्यांवर जबाबदारी कायम करून त्यांची आयुक्तांमार्फत चौकशी करण्याचा निर्णयही घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या २३६ प्राथमिक शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरु करण्यात आले होते. परंतु इंग्रजी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांची अन्यत्र बदली झाल्यामुळे काही महिन्यातच सुमारे १२१ शाळांमधील सेमी इंग्रजीचे वर्ग बंद करण्यात आले. यात विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे यापुढे सेमी इंग्रजी सुरु करण्यासाठी मंजुरी देताना शाळा व्यवस्थापन समितीची परवानगी घेऊनच वर्ग सुरु करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. सर्वशिक्षा अभियानातून किचन शेडसाठी जिल्हा परिषदेकडे २ कोटी रुपयांचा निधी पडून आहे. या खर्चाला या सभेत मंजुरी देण्यात आल्याचे सभापतींकडून सांगण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, सदस्य प्रकाश शिवगण, सदस्या वेदा फडके, नेहा माने, माधवी खताते, जान्हवी धनावडे, सदस्य विकास नलावडे, सुनील साळवी आदी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)पोषण आहार : निकृष्ट धान्य न स्वीकारण्याची सूचनाकाही शाळांमध्ये पोषण आहाराचे निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. भरड मूगडाळीचा नमुनाही या सभेत पदाधिकाऱ्यांनी आणला होता. त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारचे धान्य आल्यास ते स्वीकारू नये, अशी सूचना सभापतींनी शाळांना दिली आहे.सभापतींच्या सूचनानिकृष्ट पोषण आहाराबाबत शिक्षण समितीच्या सभेत चर्चा झाली. निकृष्ट दर्जाचा आहार कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना दिला जाऊ नये, याबाबत स्थानिक पातळीवर गंभीर रहावे, अशा सूचना यावेळी शिक्षण सभापतींनी केल्या.
आधी संचमान्यता; नंतर बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2016 10:08 PM